नाशिक : व्यावसायिकाच्या खुनाचा तपास नाशिकरोड पोलिसांकडे

शिरीष सोनवणे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एकलहरे राेडवरील फर्निचर व्यावसायिक शिरीष गुलाबराव साेनवणे यांच्या खुनाचा तपास आता नाशिकरोड पोलिसही करीत आहेत. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास नाशिकरोड पोलिसांनी सुरू केला आहे. साेनवणे यांच्या दुकानासह कारखान्यातील 10 हून अधिक कामगारांची चाैकशी करून पाेलिसांनी जाबजबाब नाेंदविले आहेत.

स्वस्तिक फर्निचर कारखान्याचे संचालक शिरीष सोनवणे हे बेपत्ता असताना, मालेगावातील सायतरपाडे कालव्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा खून झाल्याचे उघड झाल्याने मालेगाव तालुका पोलिसांत अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सोनवणे यांचे अपहरण झाल्यानंतर दोन दिवस उलटूनही त्यांच्या खुनाचे गूढ कायम असून, साेनवणे यांना नेणाऱ्या कारसह संशयितांचा माग नाशिकरोड पोलिस काढत आहेत. त्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली आहे. सोनवणे हे शुक्रवारी सायंकाळी 4.30 पासून बेपत्ता होते. या प्रकरणी मध्यरात्री 2 वाजता त्यांच्या कारखान्यातील कर्मचारी फिरोज लतिफ शेख यांनी नाशिकरोड पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर नाशिकरोड पोलिसांची चार पथके त्यांचा शोध घेत होती. शनिवारी सायंकाळी मालेगाव तालुका पोलिसांना कालव्यात सोनवणेंचा मृतदेह आढळला. त्यांचा भाऊ गजानन सोनवणे यांनी मालेगाव तालुका पोलिसांत खुनाची फिर्याद दिली. नाशिकरोड पोलिसांनी कामगारांच्या चौकशीसह सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, सोमवारी (दि. 12) सायंकाळपर्यंत त्यांना ठोस माहिती मिळालेली नाही.

सोनवणे यांचे कुणाशीही आर्थिक वाद नसल्याचे प्राथमिक तपासात समाेर येत आहे. त्यामुळे सोनवणे यांचा खून काेणत्या कारणातून झाला, याचा शोध पोलिस घेत आहेत.

कारची माहिती मिळविली

संशयितांनी वापरलेल्या कारची माहिती पाेलिसांनी काढली आहे. मालेगावातील खुनाचा गुन्हा नाशिकरोडला वर्ग होत आहे. तपास पथके संशयितांच्या मागावर असून, कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविणे सुरू आहे.

– अनिल शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नाशिकराेड पोलिस

हेही वाचा :

The post नाशिक : व्यावसायिकाच्या खुनाचा तपास नाशिकरोड पोलिसांकडे appeared first on पुढारी.