Site icon

नाशिक : व्हॅलेंटाइन’ऐवजी वैदिक मंत्रोच्चारात मातृपितृ पूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

व्हॅलेंटाइन डे म्हटले की, तरुण-तरुणींच्या उत्साहाला प्रेमाचे भरते आल्यावाचून राहत नाही. प्रेमाचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जात असले तरी त्याला पाश्चात्त्य संस्कृतीची जोड निर्माण झाल्याने या दिवसाकडे प्रेमीयुगुलांचा दिवस म्हणूनच पाहिले जाऊ लागले. परंतु, या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि तरुण-तरुणींना आपल्या संस्कृतीचे भान राहावे, यासाठी श्री योग वेदांत सेवा समितीने अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करत तरुणांमार्फत मातृपितृ पूजन करण्यात आले.

वैदिक मंत्रोच्चार करत आई-वडिलांना उंच आसनावर बसवून त्यांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेत अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. श्री योग वेदांत सेवा समिती दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन दिनाऐवजी मातृपितृ पूजन दिन साजरा करत असते. यावर्षीही समितीने मातृपितृ पूजनाचे आवाहन केले आहे. यानिमित्त नाशिक शहरात विविध ठिकाणी मातृपितृ पूजनाचे कार्यक्रम होत आहेत. अशोकनगर येथे नुकताच हा कार्यक्रम संपन्न झाला. परिसरातील अनेक माता-पिता आणि मुलांनी एकत्र येत मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम केला. यावेळी श्री योग वेदांत समितीने आपल्या जीवनात आई-वडिलांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे समजावून सांगत उपस्थित मुलांकडून संकल्प करून घेतला की, ते आपल्या आई-वडिलांना कधीच दुःख देणार नाहीत. त्यांना विसरणार नाहीत. प्रत्येकाला आपले आईवडील फार आदरणीय असतात. त्यामुळे त्यांचा नेहमीच मान ठेवला पाहिजे.

मातृ-पितृ पूजन दिनाच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योग वेदांत सेवा समितीचे साधक हे समर्पण भावनेने नेहमीच कार्यरत असतात. यामध्ये विशेष करून आसारामजी बापू आश्रमातील संचालक प्रफुल व्यास, रामभाई, नारायण भाई तसेच म्हसरूळ येथील नामदेव मुळाणे, सातपूर येथील संजय प्रसाद, इंदिरानगर येथील सुरेश काळे, गंगापूर रोड येथील प्रभाकर गाजरे, जेलरोड येथील भालचंद्र सोनार, पवननगर येथील महारू हिरे आणि इंदिरानगर येथील सुनील शिंदे, तसेच बालसंस्कार मंडल, ऋषिप्रसाद मंडल, महिला उत्थान मंडल, युवा सेवा संघ यांचा विशेष योगदान या सेवा कार्यामध्ये लाभले. श्री योग वेदांत सेवा समितीतर्फे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये दिवाळीनिमित्त आदिवासी पाड्यांवर फराळ वाटप, अन्नदान, कपडे वाटप त्याचप्रमाणे भजन करो, भोजन करो और दक्षिणा पाओ यासारखे उपक्रम तसेच बालसंस्कार केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे धडे देण्याचे कामदेखील योग वेदांत सेवा समितीने सुरू ठेवले आहे.

योग वेदांत समितीचे आवाहन
आई-वडिलांनीही आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले तर समाजात फैलावत असलेला वृद्धाश्रमरूपी रोग आपोआप बरा होईल. यावेळी अनेक आईवडिलांनी आपली मुले आपली अशा प्रकारे सेवा करताना बघून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दरम्यान, १४ फेब्रुवारीला तरुण-तरुणींनी व्हॅलेंटाइन डे ऐवजी आपली संस्कृती जपत आपल्या आई वडिलांचे पूजन करून हा दिवस साजरा करावा, असे आवाहन श्री योग वेदांत समितीने केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : व्हॅलेंटाइन'ऐवजी वैदिक मंत्रोच्चारात मातृपितृ पूजन appeared first on पुढारी.

Exit mobile version