नाशिक : शहरातील अवैध बांधकामे तपासणीसाठी मनपाची ३१ पथके

अवैध बांधकाम,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या उत्पन्नात निर्माण झालेली सुमारे ४५० कोटींची तूट भरून काढण्यासह शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच वापरातील बदल, अनधिकृत नळजोडणी आणि मिळकतींचा अवैध वापर यांची तपासणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. तपासणीकरिता सहाही विभागांत ३१ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही मोहीम शुक्रवार (दि. २७) पासून चार दिवस सुरू राहणार आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या मनपा अर्थसंकल्पात आयुक्तांनी १६०० कोटी इतक्या उत्पन्नाचा अंदाज धरला होता. वर्षाअखेरीस जमा-खर्चाचा ताळेबंद मांडताना जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात जवळपास ४५० कोटींची तूट निर्माण झालेली समोर आली आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी आता मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. तूट भरून काढण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च हे दोनच महिने मनपाकडे आहेत. महापालिकेला शासनाकडून जीएसटीच्या निधीतून मोठा हातभार लागतो. घरपट्टी व पाणीपट्टी तसेच नगररचना विभागामार्फत प्राप्त होणारा विकास शुल्क या तीन बाबींतून मनपाच्या तिजोरीत मोठा निधी जमा होत असताे. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून मालमत्ता करामध्ये मोठी घट झाली आहे. पाणीपट्टी कराचे दिलेले उद्दिष्टही साध्य होत नसल्याने मोठी तूट निर्माण झाली आहे. बीओटीवर मनपाच्या मिळकती विकसित करून त्यातून सुमारे 250 कोटींचा निधी मिळणार होता. मात्र हा प्रकल्पही रद्द झाल्याने तिजोरीत पैसा जमा होऊ शकला नाही. जवळपास 125 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले. पाणीपट्टीतून ७५ कोटींपैकी अवघे ३५ कोटी, तर घरपट्टीतून 150 कोटींपैकी ७५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वर्षाचे अंदाजपत्रक तयार करताना उत्पन्न वाढविण्याबरोबरच उत्पन्नातील तूट भरून काढून विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कंबर कसली आहे.

या बांधकामांची होणार तपासणी

शहरातील अवैध बांधकाम, वापरातील बदल, अनधिकृत नळजोडणी, महापालिकेच्या मिळकतींचा तसेच भूखंडांचा अनधिकृत वापर, टेरेसचा अनधिकृत वापर, लॉजिंगची वाढविलेली संख्या, हॉस्पिटलमधील वाढविण्यात आलेले बेड. परंतु, त्याची परवानगी नसल्यास अशा बाबींची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात भर तर पडेलच शिवाय बेकायदेशीर बाबीही समोर येतील.

पथकात यांचा असेल समावेश

सिडको विभागात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती आहे. नाशिकरोड विभागात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश निकम पालक अधिकारी असतील. पश्चिम विभागासाठी कार्यकारी अभियंता नितीन पाटील, पूर्व विभागात कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, तर सातपूर विभागात सचिन जाधव आणि पंचवटी विभागाकरिता कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात २५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने अनधिकृत बांधकामे तसेच वापरातील बदल याबाबत मोठ्या प्रमाणावर तपासणी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने शोध मोहीम राबवली जाणार आहे.
– डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, मनपा.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरातील अवैध बांधकामे तपासणीसाठी मनपाची ३१ पथके appeared first on पुढारी.