नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट

Crime News

नाशिक : गौरव आहिरे
शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांनुसार 2021 च्या तुलनेने 2022 मध्ये 18 टक्क्यांनी गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. 2021 मध्ये शहरातील चौदा पोलिस ठाण्यांमध्ये तीन हजार 666 गुन्हे दाखल होते. तर 2022 मध्ये यात वाढ होऊन चार हजार 455 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे 2021 मध्ये दोन हजार 185 आकस्मिक मृत्यूची नोंद होती, तर 2022 मध्ये दोन हजार 270 जणांची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

गुन्हेगारी व गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी गुन्हा घडल्यानंतर पोलिस ठाण्यांमध्ये आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले जातात. त्यानुसार खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, बलात्कार, विनयभंग, विवाहितेचा छळ आदी शरीर व महिलांविरोधातील गुन्ह्यांसह जबरी चोरी, दरोडा, घरफोडा, चोरी, वाहनचोरी, तोडफोड आदी मालमत्तेविरोधी गुन्हे दाखल केले जातात. त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासन कायद्यानुसार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जाळपोळ, मालमत्तेवर अतिक्रमण करणे, फसवणूक, अपहार आदी गुन्हे दाखल होत असतात. दरम्यान, 2021 मध्ये कोरोनाची लाट असल्याने सर्वसामान्य जनजीवनावर निर्बंध होते. त्यामुळे गुन्हेगारीही आटोक्यात होती. निर्बंध शिथिल होण्यास सुरुवात झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. त्यानुसार गुन्हेगारही सक्रिय झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे 2021 अखेरीसपर्यंत शहरात तीन हजार 666 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक 471 गुन्हे अंबड पोलिस ठाण्यात दाखल होते. त्याखालोखाल पंचवटीत 409, नाशिकरोडला 339 गुन्हे दाखल होते. तर 2022 मध्ये अंबडमध्ये सर्वाधिक 626 गुन्हे दाखल झाले असून, त्याखालोखाल पंचवटीत 520, नाशिकरोडला 407 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 2021 च्या तुलनेने गतवर्षात चोरी, वाहनचोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. तर 2021 च्या तुलनेने गतवर्षात इंदिरानगर, सरकारवाडा व सायबर पोलिस ठाण्यांमध्ये कमी गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिस ठाणेनिहाय दाखल गुन्हे (कंसात 2021 मधील गुन्हे)…
अंबड 623 (471), पंचवटी 526 (409), नाशिकरोड 407 (339), मुंबईनाका 390 (335), भद्रकाली 390 (323), उपनगर 359 (286), गंगापूर 357 (240), आडगाव 336 (229), सातपूर 326 (212), म्हसरूळ 233 (174), इंदिरानगर 220 (253), सरकारवाडा 217 (240), देवळाली कॅम्प 146 (112), सायबर 25 (43).

दोन वर्षांत साडेचार हजार मृत्यू…
शहरात जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत चार हजार 455 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू आत्महत्या व हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. त्याचप्रमाणे वयोवृद्ध झाल्याने, आजारपण, अपघातांमुळे मृत्यू झालेल्यांच्याही नोंदी पोलिस ठाण्यांमध्ये आहे.

हेही वाचा:

The post नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ तर अंबड ठरतेय गुन्हेगारांचे हॉटस्पॉट appeared first on पुढारी.