नाशिक : शहरातील जुने फेरीवाला क्षेत्र रद्द होणार, मनपा आयुक्तांचे आदेश

मनपा आयुक्त नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय फेरीवाला धाेरणांतर्गत दुसऱ्या टप्प्यात शहरातील नवनवीन वसाहतींमध्ये नवीन फेरीवाला क्षेत्र (हॉकर्स झोन) निश्चित करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे आदेश मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात सध्या १२५ हाॅकर्स झाेन असून, या झोनची पडताळणी करून गरज नसलेले झोन रद्द करण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाने २०१३ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धाेरण राबविण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेने शहरात पहिल्या टप्प्यात १२५ हाॅकर्स झाेन निश्चित केले आहेत. तसेच शहरात १०,६१४ फेरीवाल्यांची बायोमेट्रिक नाेंदणी झालेली आहे. परंतु, निश्चित झालेल्या बहुतांश हॉकर्सच्या जागेवर फेरीवाले स्थलांतरितच झालेले नाहीत. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे यासंदर्भातील कामही थंडावले. परंतु, याच कालावधीत रोजगार, नोकरी गेल्याने हॉकर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याकडे फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत फेरीवाला धाेरणाची दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना देत, गरज असलेल्या ठिकाणी झोन निश्चित करण्याची सूचना केली आहे.

१०,६१४ हाॅकर्सपैकी अद्यापपर्यंत केवळ १,१२४ फेरीवाल्यांनीच नाेंदणी प्रमाणपत्र घेतले आहे. त्यामुळे उर्वरित फेरीवाल्यांनी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी एका महिन्यात संबंधितांना फेरीवाला नाेंदणी प्रमाणपत्र अदा करण्यासाठी नियोजन करण्याबाबत अल्टिमेटम दिला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरातील जुने फेरीवाला क्षेत्र रद्द होणार, मनपा आयुक्तांचे आदेश appeared first on पुढारी.