नाशिक : शहरातील जुलूस-ए-गौसिया मिरवणुकीने वेधले लक्ष

जुलूस-ए-गौसिया मिरवणूक,www.pudhari.news

जुने नाशिक: पुढारी वृत्तसेवा
‘गौस-ए-आझम का दरबार अल्लाह अल्लाह क्या कहना, बगदादी नूरी बाजार अल्लाह अल्लाह क्या कहेना’, ‘इधर भी निगाहे करम गौसे आझम, करो दूर रंजो अलम गौसे आझम’, अशा अनेक धार्मिक गीत गुणगुणत भक्तिमय वातावरणात जुलूस-ए-गौसिया मिरवणूक ज्येष्ठ धर्मगुरू तथा खतीबे शहर हिसामोद्दिन अशरफी व स्थानिक धर्मगुरू यांच्या नेतत्त्वाखाली उत्साहात व पारंपरिक पद्धतीने पार पडली.

ज्येष्ठ धर्मगुरू व सूफी संत हजरत गौस-ए-आझम यांच्या स्मरणार्थ ग्यार्‍हवीं शरीफचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातून जुलूस-ए-गौसिया मिरवणूक काढण्यात आली होती. जहांगिर मशीद चौक मंडई येथून सुमारे चार वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. यापूर्वी खतीबे शहर हिसामोद्दिन अशरफी यांनी देश व देशवासीयांसाठी विशेष प्रार्थना करत उपस्थितांना गौस-ए-आझम यांच्या शिकवणींची आठवण करून देत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी खतीबे शहरसह सय्यद मिर मुख्तार अशरफी, मौलाना मेहबूब आलम, काजी-ए-शहर एजाज काजी आदी धर्मगुरूंना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपआयुक्त दीपाली खन्ना, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील रोहकले, शाहू खैरे, जावेद शेख, अशोक पंजाबी आदी मान्यवर उपस्थित होते.

मिरवणुकीत दावते इस्लामी, सुन्नी दावते इस्लामी, रझा अकादमी, नूरी मिशन चॅरिटेबल ट्रस्ट, जमात रजाए मुस्तफा व जीलानी मिशन या सारख्या अनेक धार्मिक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणूक बडी दर्गाह शरीफ येथे दाखल होताच धर्मगुरुंद्वारे फातेहा पठण, मनकबत, सलातो सलाम व प्रार्थनेनंतर मिरवणुकीची सांगता झाली.

मिवणुकीदरम्यान खजूर, नानकटाई, बिस्कीट, पाणी, केक, चॉकलेट अश्या अनेक खाद्य पदार्थ मोफत वाटप करण्यात येत होते. दोन्ही बाजूला उपस्थित जनसमुदाय मिरवणुकीत सहभागी पादचार्‍यांवर गुलाब पाणी व पुष्प अर्पण करीत होते. भद्रकाली पोलिसांतर्फे मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त तैनात होता.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरातील जुलूस-ए-गौसिया मिरवणुकीने वेधले लक्ष appeared first on पुढारी.