नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सलग 15 दिवस कारवाई

अतिक्रमण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, एमजी रोड, धुमाळ पॉइंट ते दहीपूल, रविवार कारंजा ते बोहोरपट्टी, सराफ बाजार या भागांत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आली. यात केवळ किरकोळ विक्रेत्यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले. बेकायदेशीर बांधकामे करून रहदारीला अडथळा ठरत असलेल्यांना मात्र अभय दिले. छोट्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यातच अतिक्रमण निर्मूलन विभागाने धन्यता मानली. ही कारवाई पुढील 15 दिवस केली जाणार आहे.

दि नासिक सराफ असोसिएशनच्या वतीने आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन देत शहराच्या मध्यवर्ती व्यापारी परिसरातील अतिक्रमणे व अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करावी, या परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जावी तसेच पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. अतिक्रमणाच्या समस्येमुळे मध्यवर्ती बाजारपेठेत ग्राहक येऊ शकत नसल्याची स्थिती आहे. सराफ बाजार, कापड बाजार या परिसराला ऐतिहासिक महत्त्व असून, ही अत्यंत जुनी बाजारपेठ म्हणून नावारूपास आहे. मात्र, अतिक्रमणाच्या विळख्यामुळे बाजारपेठ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशात या भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा ही बाजारपेठ नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याबाबतचे निवेदन सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, सेक्रेटरी किशोर वडनेरे यांच्यासह सराफ व्यावसायिकांनी दिले.

यावेळी आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला तत्काळ परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली, मात्र नेहमीप्रमाणे किरकोळ विक्रेत्यांनाच लक्ष केल्याने पक्क्या अतिक्रमणाचा मुद्दा कायम असल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी पोहोचण्याअगोदरच तेथील विक्रेते आपले साहित्य घेऊन भूमिगत होत असल्याचे चित्र शालिमार परिसरात नेहमीच बघावयास मिळते. तसेच कर्मचार्‍यांची पाठ फिरताच पुन्हा रस्त्याच्या मधोमध दुकाने थाटली जातात. या कारवाईदरम्यानही असेच काहीसे चित्र दिसून आले. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या या कारवाईला कितपत अर्थ आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाशिक : मुख्य बाजारपेठेतील बहुतांश विक्रेत्यांनी थेट रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने याठिकाणी कारवाई करताना अतिक्रमण निर्मुलन विभाग.(सर्व छायाचित्रे – हेमंत घोरपडे)

भाजीविक्रेते रडारवर
सराफ बाजारासह दहीपूल, रविवार कारंजा या भागांत भाजीपाला विक्रेते बसतात. अतिक्रमण निर्मूलन विभागाने या विक्रेत्यांनाच लक्ष्य करीत त्यांच्याकडील भाजीपाला जप्त केला. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचार्‍यांची पाठ फिरताच पुन्हा एकदा भाजीबाजार भरल्याचे चित्र दिसून आले.

अतिक्रमित जागेवर भाडे आकारणी
मुख्य बाजारपेठेतील बहुतांश विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पक्के बांधकाम केले आहे. या ठिकाणी भाडेकरू ठेवून त्यांच्याकडून महिन्याकाठी तीन ते चार हजार रुपये भाडेही वसूल केले जाते. सराफ बाजारात असे प्रकार सर्रास दिसून येतात. अशात हे अतिक्रमण हटविल्यास, बाजारपेठेचा श्वास मोकळा होऊ शकतो, अशी भावना व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सलग 15 दिवस कारवाई appeared first on पुढारी.