नाशिक शहरातील स्मार्ट रस्त्याचे खड्डे कधी बुजणार?

पंचवटी www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पंंचवटीसह शहराच्या अनेक भागांत गेल्या अनेक महिन्यांपासून पुन्हा एकदा वेगवेगळ्या पाइपलाइन, केबल क्रॉसिंग, सिग्नल यंत्रणा उभारणी यासाठी रस्ते खोदण्याचे काम जोमात सुरू आहे. आधीच रस्ते अतिशय अरुंद असून, त्यात खोदाई केल्याने ते अर्धेच झाले आहेत. मात्र, ते लवकर बुजवण्याची तत्परता दाखविली जात नसल्याने वाहनधारक व नागरिकांना कोमात जाण्याची वेळ आली असून, हे काम कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पंंचवटीतील निमाणी ते सेवाकुंज या भागात नव्याने काही पाइपलाइन टाकण्याचे काम गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरू आहे. तसेच मखमलाबाद नाका, पेठ फाटा, सेवाकुंज आणि काट्या मारुती चौक येथे सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असता, त्यांच्या भूमिगत वायरी नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदून ठेवलेले आहेत. आजच्या घडीला या भागातील सिग्नल यंत्रणा उभारून ती कार्यान्वित झाली असली, तरीदेखील वायर टाकण्यासाठी खोदून ठेवलेले रस्ते मुरूम टाकून बुजवले आहेत. तर दुसरीकडे त्या भागातील पाइपलाइन टाकण्याचे कामदेखील पूर्ण झाले असून, त्या खोदलेल्या रस्त्यावर खडीची भर टाकून खड्डे बुजवण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने तसेच ज्या विभागाचे काम सुरू आहे, त्यांनी याची दखल घेत लवकरात लवकर काम पूर्ण करत रस्ते पूर्ववत वापरासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

स्मार्टपणा कधी दिसणार?
स्मार्ट कामांसाठी अनेक रस्त्यांवर कुठलेही नियोजन न करता ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे. जे रस्ते खोदण्यात आले आहेत ते आधीच अतिशय अरुंद आहेत. त्यात आणखी रस्ते खोदल्याने रस्त्यांचा आकार अर्ध्यावर आला आहे. काम करताना टप्प्याटप्प्याने जमेल तसे नियोजनशून्यपणाने सुरू आहे. संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. एकाही ठिकाणी रस्ता खोदून काम पूर्ण करून तो पूर्णपणे बुजवण्यात आलेला नाही. एका ठिकाणी खोदलेल्या रस्त्यावर त्याचे काम पूर्ण न करता फक्त अनेक ठिकाणी खोदकामच सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना व पादचार्‍यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

The post नाशिक शहरातील स्मार्ट रस्त्याचे खड्डे कधी बुजणार? appeared first on पुढारी.