नाशिक शहरातील २८ ब्लॅकस्पॉटवर गतिरोधक बसविण्याचे आदेश

गतिरोधक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मिर्ची चौकातील बस दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त या प्रमुख अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या ट्रॅफिक सेलने अर्थातच रस्ते सुरक्षा समितीने सुचविल्याप्रमाणे शहरातील २८ ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला देत कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

मागील महिन्यात ट्रॅफिक सेलच्या बैठकीत मिर्ची चौकातील बस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील अपघातस्थळांचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली होती. चौक तसेच रस्त्यातील दृश्यमानतेच्या दृष्टीने चौकांमधील सूचना फलक, त्यांचे ठिकाण, रंग, डिझाइन निश्चित करणे, विविध ठिकाणी वाहतूक नियोजन व पेट्रोलिंगच्या दृष्टीने पोलिस चौक्यांची ठिकाणांबाबत रेझिलिइन्ट कंपनीच्या तज्ज्ञांनी अहवाल सादर करावा, असे सांगण्यात आले होते. तसेच रेझिलिइन्ट इंडिया कंपनीचे राजीव चौबे यांनी शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करत १५ दिवसांत अपघाती स्थळांचे (ब्लॅक स्पॉट) सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय तसेच राज्य महामार्ग तसेच महापालिकेच्या रस्त्यांवरील अपघाती स्थळांवर पहिल्या टप्प्यात गतिरोधक बसविण्यात येणार आहेत.

१८६ अपघातांत ६० मृत्यू

वाहनांची वेगमर्यादा ३० असेल तर मृत्यूचे प्रमाण १० टक्के इतके असते. मात्र वेग ६० किमी प्रतितास असेल तर मृत्यूचे प्रमाण ९५ टक्के असते. विना हेल्मेटमुळेदेखील मृत्यूचे प्रमाण वाढल्याची माहिती खातेप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आली. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात वेगाने वाहन चालविल्यामुळे १८६ अपघात घडले. त्यात ६० जणांचा मृत्यू झाला. हेल्मेट न वापरल्यामुळे झालेल्या दुचाकी अपघातांत ४८ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या ठिकाणी टाकणार गतिरोधक

शहरातील एबीबी सर्कल, शरणपूर रोड सिग्नल, वेदमंदिर चौक, बळी मंदिर, रासबिहारी चौफुली, शिंदे गाव शिवार, द्वारका सर्कल, फेम सिग्नल, राहू हॉटेल सिग्नल, के. के. वाघ महाविद्यालय सिग्नल, जत्रा हॉटेल चौफुली, एमआयडीसी सातपूर, सिद्धिविनायक चौक, कार्बन नाका, ट्रक टर्मिनस, आडगाव, तपोवन क्रॉसिंग, स्वामीनारायण चौफुली, जुना गंगापूर नाका, नांदूर नाका, उपनगर नाका सिग्नल, चेहडीगाव फाटा, दत्तमंदिर सिग्नल, पळसे गाव बसस्टॉप, मिर्ची चौक सिग्नल, तारवालानगर सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, एक्सलो पॉइंट, सीबीएस याठिकाणी गतिरोधक उभारले जाणार आहेत.

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शहरातील २८ प्रमुख ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी प्राधान्याने गतिरोधक बसवले जाणार आहे. त्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल.

– नितीन वंजारी, शहर अभियंता

हेही वाचा :

The post नाशिक शहरातील २८ ब्लॅकस्पॉटवर गतिरोधक बसविण्याचे आदेश appeared first on पुढारी.