नाशिक : शहरात आज पाणीपुरवठा नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महावितरण कंपनीकडून पावसाळापूर्वीची कामे हाती घेतल्याने शनिवारी (दि. २९) शहरात शट डाउन पाळला जाणार आहे. परिणामी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

महावितरण कंपनीकडून शनिवारी वीज उपकेंद्र आणि मुख्य वीजवाहिन्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या गंगापूर आणि मुकणे धरणांतील उपसा केंद्रांचा वीजपुरवठा बंद असणार आहे. परिणामी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच रविवारी (दि. ३०) सकाळी कमी दाबाने, कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. शहराला गंगापूर व मुकणे धरणांतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ केव्ही सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरून ३३ केव्ही एचटी वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या पंपिंग स्टेशनद्वारे मनपाचे बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र यांना रॉ वॉटरचा पुरवठा करण्यात येतो. महावितरण कंपनीकडून ओव्हरहेड लाइनची दुरुस्ती व पावसाळापूर्व कामे (सातपूर कॉलनी ते कार्बन नाका ते गंगापूर धरण पावेतो) करण्यासाठी तसेच मनपाचे मुकणे रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड कार्यान्वित सबस्टेशन गोंदे येथून एक्स्प्रेस फिडरवरून जॅकवेलसाठी ३३ केव्ही वीजपुरवठा आहे. महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये महावितरण कंपनीस सबस्टेशनमधील दुरुस्ती कामे करण्यासाठी वीजपुरवठा बंद राहणार आहे.

महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरात पावसाळापूर्व नालेसफाईची कामे सुरू करण्यात आली आहेत. पावसाळी गटार, नाले, चेंबरची साफसफाई केली जात आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरातील सहा विभागांतील नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरात आज पाणीपुरवठा नाही appeared first on पुढारी.