Site icon

नाशिक शहरात उभारणार १३ फाइव्ह स्टार टॉयलेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिका शहरात विविध १३ ठिकाणी नागरिकांसाठी फाइव्ह स्टार टॉयलेट उभारणार आहे. त्यासाठी केंद्र शासन निधी देणार आहे. यासंदर्भात शासनाचे मार्गदर्शक तत्त्वे नाशिक महापालिकेला प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनातर्फे देशातील शहरांमध्ये दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेण्यात येते. स्पर्धेमध्ये नाशिक महापालिकेनेदेखील सहभाग घेतला असून, मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये नाशिक मनपाने देशात २० वा, तर राज्यात पाचवा क्रमांक मिळविला होता. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ करता देशातील प्रथम ५ शहरांमध्ये येण्याचे उद्दिष्ट नाशिक मनपाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशान्वये शहरातील क्षेत्रीय देखरेखीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. उपआयुक्त प्रशासन यांची मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक, तर शहरातील प्रत्येक विभागाकरता एका पालक अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच विभागीय अधिकाऱ्यांची विभागीय समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र पर्यवेक्षीय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सेवा व शहर, अधीक्षक अभियंता पाणीपुरवठा व मल:निसारण विभाग, उद्यान अधीक्षक व स्मार्ट सिटी सीईओ यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांना स्वच्छतेसंदर्भातील अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यादृष्टीने केंद्र शासनाने फाइव्ह स्टार टॉयलेटची संकल्पना आणली असून, नाशिक महापालिकेने ती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १३ ठिकाणी टॉयलेट उभारले जाणार आहेत. त्याअंतर्गत कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, राजीव गांधी मुख्यालय, बिटको रुग्णालय यासह १३ ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत.

कॅफेटेरिया आणि बरंच काही

फाइव्ह स्टार टॉयलेट संकल्पनेअंतर्गत वेंडिंग मशीन, कॅफेटेरिया यासह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या टॉयलेट व सुविधांचा वापर करणाऱ्यांकडून ठराविक शुल्क घेतले जाणार असून, या टॉयलेटची देखभाल सुलभ इंटरनॅशनलकडे सोपविली जाणार आहे. एका फाइव्ह स्टार टॉयलेटसाठी केंद्र शासनाकडून सुमारे अडीच लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यात नाशिक महापालिका स्वत:चा काही निधी वापरून ही संकल्पना राबविणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालिका डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक शहरात उभारणार १३ फाइव्ह स्टार टॉयलेट appeared first on पुढारी.

Exit mobile version