नाशिक शहरात ‘या’ 15 ठिकाणी उभारणार चार्जिंग स्टेशन

चार्जिंग स्टेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिल्ली येथील यूएनडीपी कंपनी प्रशासनाने शहरातील 15 ठिकाणी चार्जिंग स्टेशन बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. चार्जिंग स्टेशनसाठी महापालिका प्रशासनाने पंधरा लोकेशन निश्चित केले असून, त्याचा प्रस्ताव यूएनडीपी कंपनी प्रशासनाला पाठविला आहे. शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी झाल्यावर इंधन वापरात मोठी कपात होऊन शहर प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.

स्मार्ट सिटीअंतर्गत नाशिक शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. असे असले तरी शहर प्रदूषणमुक्त व्हावे, यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शहरातील विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांकडून खासदार गोडसे यांच्याकडे सतत होत होती. यातूनच काही महिन्यांपूर्वी खा. गोडसे यांनी यूएनडीपी कंपनी प्रशासनाशी संपर्क साधून शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्याकामी आपल्या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. शहरे प्रदूषणमुक्त होणे गरजेचे असल्याच्या दृष्टिकोनातून खासदार हेमंत गोडसे यांनी निधी उपलब्धतेची केलेली मागणी कंपनी प्रशासनाकडे केली. यातूनच यूएनडीपी कंपनी प्रशासनाने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.

या ठिकाणी असेल चार्जिंग स्टेशन
यूएनडीपीने पाठवलेल्या पत्राची दखल घेत महापालिका प्रशासनाने शहरात 15 ठिकाणी चार्जिंग स्टेशनच्या लोकेशनचा प्रस्ताव यूएनडीपी कंपनी प्रशासनाला पाठविला आहे. यामध्ये मनपा राजीव गांधी भवन, मनपा पूर्व, पश्चिम, सिडको, नाशिकरोड, सातपूर, पंचवटी ही विभागीय कार्यालये तसेच बिटको हॉस्पिटल, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, महाकवी कालिदास कला मंदिरासमोरील पार्किंग, इच्छामणी मंगल कार्यालय, बोधलेनगर, लेखानगर, गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यान, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक या लोकेशनचा समावेश आहे.

हेही वाचा :

The post नाशिक शहरात 'या' 15 ठिकाणी उभारणार चार्जिंग स्टेशन appeared first on पुढारी.