नाशिक : शहरात ७८५ बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण

नाशिक : गोवर लसीकरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेकडून पाच दिवसांत शहरातील एकूण ७८५ बालकांचे गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले आहे. त्यात आरोग्य सेविकांमार्फत ‘एमआर१’ चा डोस ३९२, तर ‘एमआर २’ चा डोस ३९३ बालकांना देण्यात आला आहे.

वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात १५ ते २५ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात १५ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत गोवर रुबेला लसीकरण होणार आहे. या मोहिमेत महापालिका क्षेत्रात आरोग्यसेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २७५ बालकांना लसीकरण करण्यात आले होते. औरंगाबाद नाका, पंचवटी येथे राहणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील बालकांनाही लसीकरण करण्यात आले आहे.

दोन डोसमधील अंतर २८ दिवस

शहरातील नऊ महिने ते ५ वर्षे वयाच्या बालकांचा गोवर रुबेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस अथवा दोन्ही डोस राहिलेल्या बालकांची यादी तयार करण्यात आली आहे. लशीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवस असेल याची खबरदारी घेण्याची सूचना शासनाच्या आरोग्य विभागाने केली आहे. या मोहिमेत स्थानिक वैद्यकीय व्यवसायिक संघटना आणि बालरोग तज्ज्ञ संघटना यांचाही सहभाग असावा, अशी सूचना शासनाने केली आहे. नाशिक शहरातील पालकांनी मुलांसाठी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, सर्वेक्षणाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरात ७८५ बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण appeared first on पुढारी.