नाशिक : शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणार

गोदावरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर सौंदर्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्यात येणार असून, त्याकरिता गठीत करण्यात येणार्‍या समितीत शहरातील वास्तुविशारदांना स्थान देण्यात येणार आहे. केवळ वास्तुविशारदांनाच नव्हे, तर शहरी भागातील आमदार, खासदारांनादेखील हे अभियान राबविणे बंधनकारक राहणार आहे. या अभियानांतर्गत, शहराचे विद्रूपीकरण होईल, अशा राजकीय उपक्रमांवर बंदी घालण्यात येणार असल्याने या अभियानामुळे होर्डिंगबाजीला चाप बसणार आहे.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने शहर सौंदर्याच्या दृष्टीने लक्ष देण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मनपाला शासन आदेश प्राप्त झाले आहेत. महापालिका आयुक्त, शहर अभियंता, नगर रचनाकार, आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी हे कायमस्वरूपी, तर बांधकाम विकासक संघटना, शैक्षणिक संस्था, वास्तुविशारद, औद्योगिक संस्था हे समितीचे निमंत्रित सदस्य असतील. तसेच आमदार आणि खासदार हे विशेष निमंत्रित सदस्य राहतील. शहर सौंदर्यीकरण करताना वास्तुविशारद संघटनांकडून शहर सौंदर्यीकरणाच्या निर्णयात सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शहर सौंदर्यीकरण समितीत संबंधितांचा समावेश केला आहे. शहर सौंदर्यीकरण अभियानांतर्गत शहरातील सर्वच दुकानांवरील पाट्या एकाच प्रकारातील रंगसंगतीमध्ये करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. दुकानांच्या नावांच्या पाट्या कशा असाव्यात, याबाबत एकसारखा विचार केला जात नाही. त्यामुळेच सौंदर्याच्या अनुषंगाने समितीमार्फत शहरातील सर्व दुकानांच्या पाट्या एकाच प्रकारच्या असतील.

शहराची परंपरा, संस्कृती जोपासणार
अभियानांतर्गत अस्वच्छ जागांची निश्चिती करून त्या जागांचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. भित्तीचित्रे, कारंजे, शिल्प उभारणे, जनजागृतीपर चित्र रेखाटणे तसेच वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्याची सूचना केली आहे. दुभाजक स्वच्छ करणे, दुभाजकांवर शिल्प उभारणे, फुलझाडांची लागवड करणे, प्रमुख इमारती, शैक्षणिक संस्थांच्या इमारती व हेरिटेज इमारतींवर समर्पक भित्तीचित्रे रेखाटण्यात येणार आहेत. भुयारी मार्ग, पादचारी मार्ग, उन्नत मार्ग, उड्डाणपूल सुशोभित करण्याचीदेखील सूचना केली आहे. सौंदर्यीकरण करताना त्या-त्या शहराची परंपरा, इतिहास, संस्कृती जोपासण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणार appeared first on पुढारी.