नाशिक : शालेय पोषण आहाराच्या किचनची पुन्हा तपासणी

शालेय पोषण आहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेसह शहरातील खासगी अनुदानित शाळांना शालेय पोषण आहार पुरवठा करणार्‍या मनपा ठेकेदारांच्या किचनशेडची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीसाठी चार पथके स्थापन करण्यात आली असून, पथकांमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांसह मनपाच्या केंद्रप्रमुखांचा समावेश आहे. मुलांना दिल्या जाणार्‍या आहाराचा दर्जा योग्य आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे.

मनपाने यापूर्वीदेखील अशा प्रकारे किचनशेडची पाहणी केली होती. या पाहणीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्याने 13 ठेकेदारांचे ठेके मनपाने रद्द केले होते. यानंतर महापालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबविली. परंतु, त्यास जुन्या ठेकेदारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच काही ठेकेदारांनी माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर वर्षा गायकवाड यांनी शिक्षण संचालक विभागामार्फत नाशिक मनपाच्या ठेकेदारांच्या गोदामाची तसेच कामकाजाची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तर न्यायालयाने नवीन निविदा प्रक्रिया पार पडेपर्यंत जुन्याच ठेकेदारांना पोषण आहार पुरवठ्याचे काम देण्याचे आदेश मनपाला दिले होते. त्यानुसार जुन्या ठेकेदारांना काम देण्याबरोबरच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तत्पूर्वी शिक्षण संचालक विभागाने केलेल्या पाहणीत पंचवटीतील एका ठेकेदाराच्या गोदामामध्ये शासनाचा 14 हजार किलो तांदूळ आढळून आला होता.

या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच मनपाच्या निविदा प्रक्रियेंतर्गत महिला बचतगटांना प्राधान्य देण्याच्या मागणीनुसार ठेक्यातील अटी-शर्ती काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्या. नव्या निविदा प्रक्रियेत 20 ठेकेदार तथा बचतगट पात्र ठरले. परंतु, 10 हजार मुलांच्या गटांना आहार पुरवठ्याकरिता निविदाच प्राप्त झाल्या नाहीत. पात्र ठरलेल्या 20 पैकी 11 बचतगट प्रत्येकी चार हजार मुलांना असे एकूण 44 हजार, तर नऊ बचतगट हे प्रत्येकी दोन हजार मुलांना असे एकूण 18 हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवणार आहेत. हे काम सुरू होण्यापूर्वी संबंधित बचतगटांचे किचन योग्य आहे की नाही, आहाराचा दर्जा आणि मनुष्यबळ, वाहनव्यवस्था याबाबतची माहिती घेण्यासाठी चार पथकांची मनपाने नेमणूक केली आहे. त्यानुसार पथकांनी गुरुवारपासून (दि.15) तपासणी सुरू केली असून, दोन दिवसांत 20 बचतगटांच्या किचनची पाहणी करून अहवाल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सादर केला जाणार आहे.

मार्गदर्शनासाठी आयुक्तांना प्रस्ताव
10 हजार मुलांच्या पाच गटांना आहार पुरवठा करण्यासाठी एकही निविदाधारक तथा बचतगट पात्र ठरला नाही. परंतु, अशा बचतगटांना त्रुटी सुधारण्यासाठी संधी देऊन त्यांची निविदा ग्राह्य धरावी की नाही याबाबतचे मार्गदर्शन घेण्यासाठी आयुक्तांकडे मनपा शिक्षण विभागामार्फत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यावर आयुक्त काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

चार पथकांची स्थापना
पथकांमध्ये अन्न व औषध प्रशासनासह
मनपाच्या केंद्रप्रमुखांचा समावेश
दोन दिवस चालणार मोहीम
20 बचतगटांच्या किचनची पाहणी
आहाराचा दर्जा तपासणार

हेही वाचा :

The post नाशिक : शालेय पोषण आहाराच्या किचनची पुन्हा तपासणी appeared first on पुढारी.