नाशिक : शाळाबाह्य सर्वेक्षणात आढळली ‘इतकी’ बालके, एक लाख कुटुंबांचे सर्वेक्षण

शाळा बाह्य सर्वेक्षण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या शिक्षण विभागाने २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात शहरात २९ बालके आढळून आली. सर्वेक्षण पथकांनी शहरात एक लाख तीन हजार ३३९ कुटुंबांचे सर्वेक्षण केले. शाळाबाह्य आढळलेल्या २९ बालकांना मनपा शाळांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, शहरातील रस्त्यांलगत, पुलाखाली तसेच चौकांच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या मुलांचे आई-वडील मुलांना शाळेत पाठवत नसल्याची बाब समोर आली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियमातील तरतुदीअंतर्गत स्थलांतरित मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद आहे. त्यानुसार संबंधित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या बालकांना शिक्षण मिळावे, याकरता सर्वेक्षण हाती घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने परिपत्रकाव्दारे दिले आहे. नोव्हेंबरमध्ये स्थलांतरित होत असलेल्या पालकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी मनपा शिक्षण विभागाने १०७५ प्रगणकांची नियुक्ती केली होती. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत वय वर्षे ३ ते १८ या वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहर व परिसरातील वीटभट्ट्या, दगडखाणी, शेतमजूर, औद्योगिक वसाहती तसेच इतरही स्थलांतरित मजूर व कामगार येणाऱ्या ठिकाणी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. त्यात २९ बालके स्थलांतरित होऊन आलेली आणि नऊ बालके शहरातून अन्यत्र स्थलांतरित झालेली आढळली, अशी माहिती मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : शाळाबाह्य सर्वेक्षणात आढळली 'इतकी' बालके, एक लाख कुटुंबांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.