नाशिक : शिंदे गटाचा ठाकरे गटाला दे धक्का! “यांनी’ केला प्रवेश

प्रवेश www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत येण्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाला पुन्हा दे धक्का दिला आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह ११ माजी नगरसेवकांनंतर ठाकरे गटातील ६० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात शुक्रवारी (दि.६) मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी आणि आता ठाकरे गटाच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना आपलेसे करण्यात शिंदे गटाला पुन्हा एकदा यश आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिंदे गटात मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधींचे तसेच पदाधिकाऱ्यांचे प्रवेश झाले. तोपर्यंत नाशिक शहर व जिल्हा सुरक्षित मानला जात होता. तसेच नाशिकमध्ये बंड होणारच नाही, असा दावा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा खासदार संजय राऊत यांनी केला होता. यानंतर काही काळ ठाकरे गटातून काही लोक बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने ते रोखण्यासाठी संजय राऊतांनी पंधरा दिवसांच्या अंतरात दोन वेळा नाशिक गाठत सारवासारव केली. मात्र त्यांची पाठ फिरताच दुसऱ्याच दिवशी ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेला (ठाकरे गट) मोठे खिंडार पडले. त्यानंतर जिल्हासंपर्कप्रमुख असलेले भाऊसाहेब चाैधरी यांनीच जय महाराष्ट्र केल्यामुळे नाशिकच्या शिवसेनेला पुन्हा धक्का बसला. चौधरी यांच्या प्रवेशानंतर नाशिकमधून आणखी काही पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची कुणकुण लागल्याने आता राऊतांबरोबरच उद्धव ठाकरे स्वत:च नाशिकला येऊन जाहीर सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांना बळ देण्याचा प्रयत्न करणार आहेत. या दौऱ्याची चाचपणी करण्यासाठी राऊत शुक्रवारी (दि.६) सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता असतानाच ठाकरे गटातील सुमारे ६० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नाशिकमधील आणखी काही माजी नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगिकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश होणार आहेत. बाळासाहेबांची शिवसेना हाच प्रमुख पक्ष जिल्ह्यात राहणार आहे. नाशिकसह राज्याच्या विकासासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहोत. – अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेता.

पूर्व विधानसभा प्रमुख योगेश बेलदार, शहर संघटक अनिल साळुंखे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना महाराष्ट्र उपसचिव बापू लहूजी ताकाटे, नाशिकरोड शिवसेना समन्वयक शिवा ताकाटे, उप महानगर प्रमुख योगेश चव्हाणके, अमोल सूर्यवंशी, प्रमोद लासुरे, युवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख रुपेश पालकर, युवसेना नाशिक जिल्हा सरचिटणीस संदेश लवटे, विभाग प्रमुख नाना काळे, उमेश चव्हाण, प्रमोद जाधव, संदीप डहांके, विनोद नुनसे, शैलेश कार्ले, प्रसन्ना तांबट, अमेय जाधव, सहाय्यक संपर्क प्रमुख पश्चिम विधानसभा महासचिव विश्व ब्राम्हण यांच्यासह ६० पदाधिकाऱ्यांनी मनपा विरोधी पक्षनेते तथा शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते तसेच राजू लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला. सर्व पदाधिकाऱ्यांचा संघटनेत उचित सन्मान राखला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी देत नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचे संबंधितांना आदेशित केले. यावेळी महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, ज्येष्ठ नेते राजू लवटे, प्रवीण तिदमे, सुदाम डेमसे, दिगंबर मोगरे, सचिन भोसले आदी उपस्थित होते.

यांनीही केला शिंदे गटात प्रवेश

महापरिषद ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख महेश जोशी, उप विभाग प्रमुख राहुल देशमुख, प्रशांत गाडगीळ, प्रशांत निचल, स्वप्नील गायकवाड, अजय निकम, राजेश गिते, महेश लोखंडे, प्रमोद काशेकर, योगेश धामणस्कर, युवसेना महानगर संघटक गोकुळ मते, युवसेना उप महानगर प्रमुख, पोलीस बॉईज संघटना जिल्हाध्यक्ष विशाल खैरनार, युवसेना पूर्व विधानसभा प्रसिध्द प्रमुख अंकुश बोचरे, युवसेना शहर समन्वयक आकाश काळे, युवसेना विस्तारक सोशल मिडिया राकेश झोरे, युवसेना विभाग प्रमुख मोहित पन्हाळे, अमित गांगुर्डे, समीर कांबळे, शाखाप्रमुख गणेश परदेशी, राहुल रंधे, अमोल वराडे, अनिल निरभवणे, प्रशांत निचळ, तकदीर कडवे, विशाल आहेर, आनंद गटकळ, धीरज कडाळे, महाराष्ट्र शिव वाहतुक सेनाचे महाराष्ट्र राज्य सचिव लक्ष्मण पाटील, नाशिक शहर अध्यक्ष मनोज ऊदावंत, नाशिक जिल्हाप्रमुख अनिल नागरे, नाशिक जिल्हा उपअध्यक्ष संदीप कदम, नाशिक जिल्हा प्रसिध्दी प्रमुख रवींद्र पेहेरकर, सिन्नर तालुकाध्यक्ष पंकज भालेराव, उपाध्यक्ष अनिल शिंदे, नाशिकरोड अध्यक्ष उमेश सोनार आदी.

राजकारणात प्रवेश सोहळे होतच असतात. अस्वस्थ लोक अशा प्रकारचा मार्ग अवलंबतात. पक्षाची वेळ आणि सत्ता बघून येत-जात असतात. त्यामुळे आमच्या कामकाजावर कोणताही फरक पडणार नाही. प्रवेश सोहळ्यांबाबत फार चर्चा न करता आम्ही आमचे काम करत आहोत. आहे त्यांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्याचे काम सुरू आहे. येत्या काळात त्याचे स्वरूप दिसून येईल. – सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, ठाकरे गट

हेही वाचा:

The post नाशिक : शिंदे गटाचा ठाकरे गटाला दे धक्का! "यांनी' केला प्रवेश appeared first on पुढारी.