नाशिक : शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांच्या निवासस्थानाला पोलिसांचा गराडा

अजय बोरस्ते निवासस्थान,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र करत शिंदे गटात दाखल झालेल्या मनपाचे माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, शिंदे गटात गेलेल्या इतरही माजी नगरसेवकांना सुरक्षा दिली जाणार असून, मनसेचे शहर समन्वयक सचिन भोसले यांच्या निवासस्थानी देखील बंदोबस्त आहे.

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार फुटून बाहेर पडले आणि त्यानंतर बाळासाहेंची शिवसेना अर्थात शिंदे गटामध्ये महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, आजी माजी खासदार, आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. अशा मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली होत असताना नाशिकमध्ये मात्र ठाकरे गट मजबूत स्थितीत हाेता. शिवसेना नेते संजय राऊत हे देखील नाशिकवर लक्ष ठेवून होते. अशा स्थितीत मात्र ठाकरे गटातून नऊ माजी नगरसेवकांनी एक्झिट घेत शिंदे गट गाठल्याने ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. गुरूवारी (दि.१५) रात्रीच ठाकरे गटाचे नऊ नगरसेवकांसह मनसेचे शहर संघटक सचिन भोसले, माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांनी मुंबई गाठत मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या सर्व माजी नगरसेवकांच्या गटाचे नेतृत्व बोरस्ते यांनी केले. यामुळे नाशिक शहराला मोठे सुरूंग लागल्याने बोरस्ते यांच्यावर ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाकडून काही प्रतिकार होऊ नये याची खबरदारी म्हणून बोरस्ते यांच्या पंडित कॉलनीतील निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनसेतून शिंदे गटात दाखल झालेल्या सचिन भोसले यांच्या निवासस्थानी देखील पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे

हेही वाचा :

The post नाशिक : शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांच्या निवासस्थानाला पोलिसांचा गराडा appeared first on पुढारी.