नाशिक : शिवजन्मोत्सवानिमित्ताने छत्रपती सेना साकारणार २१ फुटी कवड्यांची माळ

kawdi pujan www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यंदाच्या शिवजन्मोत्सवानिमित्ताने छत्रपती सेनेकडून २१ फुटांची ६४ कवड्यांची माळ साकारण्यात येणार आहे. छत्रपती सेनेतर्फे रविवारी (दि.२९) घनकर गल्ली येथील श्री तुळजाभवानी मंदिरात संबळाच्या निनादात कवड्यांचे विधिवत महाअभिषेक व पूजन करण्यात आले.

छत्रपती सेनेकडून शिवजन्मोत्सवानिमित्ताने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतीक असलेल्या वस्तू साकारण्यात येतात. आतापर्यंत सेनेकडून विश्वविक्रमी छत्रपती शिवराय यांचा जिरेटोप, भवानी तलवार, टाक, वाघनखे तसेच कट्यार साकारण्यात आली. यंदा संघटनेने विश्वविक्रमी कवड्यांची माळ साकारण्याचा संकल्प केला आहे.

सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात येत्या १७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ ला माळेचे अनावरण करण्यात येईल. याप्रसंगी शिवजागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी सातला शिवसमृद्धी पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, वीर योद्धे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज डॉ. शीतल मालुसरे उपस्थित राहणार आहेत. १८ तारखेला विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन स्पर्धा घेण्यात येईल. १९ तारखेला कवड्यांच्या माळेची पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी 7 ला अशोकस्तंभ मंडळाने साकारलेल्या भव्य 61 फूट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून सदर माळ ही अर्पण करण्यात येईल. संघटनेच्या शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्ष शिल्पा सोनार यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोहळ्याच्या आयोजनासाठी मेहनत घेत आहेत.

अशी असेल माळ…
छत्रपती शिवराय महाराज हे जगातील एकमेव राजे असे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींचे संघटन करणारे राजे होते. जे राजे इतर राजांप्रमाणे सोने, हिरे, जवाहिरे अशी माैल्यवान वस्तू परिधान न करता कवड्यांची माळ परिधान करायचे. छत्रपती सेनेकडून साकारण्यात येणाऱ्या माळेची प्रतिकृती 21 फूट असून, या माळेत सव्वा फुटाची एक कवडी अशा ६४ कवड्या असतील. या माळेचे वजन 71 किलो असेल.

हेही वाचा:

The post नाशिक : शिवजन्मोत्सवानिमित्ताने छत्रपती सेना साकारणार २१ फुटी कवड्यांची माळ appeared first on पुढारी.