नाशिक : शिवसेना नाशिकमध्ये एक लाख सदस्य नोंदणी करणार; पक्षप्रमुखांकडे सोपविले १० हजार प्रतिज्ञापत्र

शिवसेना www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

शिवसेनेतील बंडखोरीनंतर निष्ठावंत कोण हे सिध्द करण्यासाठी चढाओढ लागली असून, नाशिक शहरातून शिवसेनेतर्फे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे १० हजार प्रतिज्ञापत्र सुपूर्द करण्यात आले असून, नाशिक शहरातून एक लाख सदस्य संख्या नोंदविण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० हजार इतकी सदस्यता नोंदविण्यात आली आहे.

शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड तसेच मनपा माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे यांनी सोमवारी (दि.८) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने ठाकरे यांच्याकडे ९,६४७ इतके प्रतिज्ञापत्र सादर केले. दरम्यान, शपथपत्र भरून देणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश अधिक असल्याचे महानगरप्रमुख बडगुजर यांनी सांगितले. नाशिकमधील खासदार हेमंत गोडसे, आमदार दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. शिंदे गटाला नाशिकसह इतरही ठिकाणी पाठिंबा मिळत असल्याने आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला जात आहे. यावरून ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरू असून, हा वाद सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र निवडणूक आयोगाकडे सुरू आहे. ठाकरे यांनी शिवसेनेवरील आपला दावा अधिक प्रबळ असल्याचे सिध्द करण्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांकडून १०० रुपयांच्या मुद्रांकावर शपथपत्र लिहून घेतले जात आहेत. नाशिक शहरातून अशा प्रकारचे जवळपास ९,६४७ जणांनी शपथपत्र भरून दिले आहेत. शपथपत्र सोमवारी (दि.८) उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या आदर्श-तत्त्वांवर अढळ निष्ठा असून, माझा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यांच्याप्रति मी निष्ठा व्यक्त करीत आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. शिवसेना नाशिक महानगरतर्फे देवळाली, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व या चार विधानसभा मतदारसंघांतून प्रत्येकी २५ हजार अशी एक लाख इतकी सदस्य संख्या नोंदविण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत २० हजार सदस्य नोंदणी झाली असून, लवकरच उद्दिष्ट्य पूर्ण करून अहवाल सादर केला जाणार आहे, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द 

शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे मंगळवारपासून (दि.९) दोनदिवसीय दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात ते मालेगाव आणि सिन्नर येथे बैठका घेणार होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शिवसेना नाशिकमध्ये एक लाख सदस्य नोंदणी करणार; पक्षप्रमुखांकडे सोपविले १० हजार प्रतिज्ञापत्र appeared first on पुढारी.