नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, ‘यांना’ दिली जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक फेरबदल केले असून, बंडखोर आमदार सुहास कांदे यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्याकडे नांदगाव, मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघाचे प्रमुखपद होते. आता त्यांच्याऐवजी गणेश धात्रक यांच्याकडे हे पद सोपविले आहे. त्याचबरोबर नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडील दिंडोरी लोकसभा सहसंपर्कपद काढून घेत माजी जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांच्याकडे सोपविले आहे. तर युवासेनेचे कुणाल दराडे यांनाही निफाड, येवला, चांदवड या तीन मतदारसंघांच्या जिल्हाप्रमुखपदी बढती देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड करत सेनेचे 40 आमदार फोडले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सुहास कांदे आणि दादा भुसे या आमदारांचा समावेश आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले असून, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, त्याहीपेक्षा शिंदे गटाने शिवसेना आपलीच असल्याचा दावा केल्याने, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील बंडखोरांना पदांवरून बाजूला सारले जात असून, त्या ठिकाणी नवीन नियुक्त्या केल्या जात आहेत. नुकतेच शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत तीनदिवसीय नाशिक दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी संघटनात्मक बदल करण्याबाबतचे सूतोवाच केले होते. राऊत मुंबईत पोहोचताच जिल्ह्यातील पक्षसंघटनेत मोठ्या प्रमाणावर बदल केले जात आहे. विशेषत: बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांना बढत्या दिल्या जात असून, त्यांच्याकडे पक्षसंघटनेच्या जबाबदार्‍या सोपविल्या जात आहेत.

आमदार कांदे यांच्याकडील नांदगाव, मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य या तीन विधानसभा मतदारसंघांचे जिल्हाप्रमुख पद काढून घेण्यात आले आहे. तर मनमाड येथील गणेश धात्रक यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी सोपवून कांदेंना चेकमेट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या फेरबदलामुळे कुठेतरी आमदार कांदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुकांचा विचार करून हे फेरबदल केले जात असून, शिंदे गटाला बाजूला सारले जाण्याची शक्यता आहे. तर निवनियुक्त पदाधिकार्‍यांसमोर आगामी निवडणुकांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

शवसैनिकांना बढती
संघटनात्मक फेरबदल करताना शिवसैनिकांना बढती देण्याचा विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जात आहे. माजी जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांच्याकडे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवून त्यांना एक प्रकारे बढतीच दिली आहे. त्याचबरोबर आमदार नरेंद्र दराडे यांचे सुपुत्र व युवासेनेचे पदाधिकारी कुणाल दराडे यांच्याकडे निफाड, येवला, चांदवड या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविली आहे. तर दिंडोरी, कळवण आणि बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघांचे जिल्हाप्रमुखपद सुनील पाटील यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, 'यांना' दिली जबाबदारी appeared first on पुढारी.