नाशिक : शिवसेनेतील एकांडे शिलेदार हेमंत गोडसे यांनी साधली नामी संधी

हेमंत गोडसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार असूनही शिवसेनेत एकाकी पडलेले हेमंत गोडसे हे गेल्या काही वर्षांपासून नाराज होते आणि त्यामुळेच त्यांनी पक्षसंघटनेत फारसे लक्षही घातले नव्हते. शिवसेनेतील अंतर्गत कलहातून निर्माण झालेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर खासदार गोडसे यांनी संधी साधत तूर्तास तरी शिंदे गटातच सहभागी होण्याचा पर्याय निवडला आहे.

गोडसे यांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून सुरू झाली. जिल्हा परिषदेत मनसचे सदस्य राहिलेले गोडसे यांचे राजकीय चक्र जोरात फिरले. मनसेने त्यांना 2009 मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. गोडसे यांनी दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवत आपला करिष्मा दाखवून दिला. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करीत नगरसेवक आणि त्यानंतर थेट नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळांविरुद्ध पुन्हा दंड थोपटत निवडणुकीत बाजी मारली. या विजयानंतर त्यांनी सलग दुसर्‍यांदा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याचा बहुमान मिळविला. खासदारकीच्या दुसर्‍या टर्ममध्ये त्यांचे आणि शिवसेनेतील पदाधिकार्‍यांचे संबंध खास राहिले नाहीत. त्यामुळे पक्षसंघटनेतील त्यांचा सहभागही कधी लक्षणीय दिसून आला नाही. याच काळात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी वाढलेली त्यांची सलगी पाहता, पुढील काळातील भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यात आता शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्याने शिवसेनेतील जवळपास 45 आमदारांपाठोपाठ 19 पैकी 12 खासदारांनी शिंदे गटाबरोबर जाणे पसंत केले असून, त्यात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचाही सहभाग असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्याचे राजकीय प्रवाह पाहता, गोडसे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा गट
आम्ही सर्व खासदार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित असलेल्या गटासोबत असून, या गटाला आमचा पाठिंबा आहे. 2014 पासून खासदारकीच्या माध्यमातून मी विकासकामे वगळता, कधीही राजकारण केले नाही, अशी प्रतिक्रिया खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. नाशिकसाठी द्वारका ते नाशिकरोड उड्डाणपूल, निओ मेट्रो, नाशिक-पुणे रेल्वेमार्गासारखे प्रकल्प या वर्षाअखेर सुरू होण्याची आशा आहे. त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प, सिंहस्थ परिक्रमा जोडमार्ग, कृषी रेल, उड्डाण योजनेंतर्गत विमानसेवा अशा महत्त्वाच्या कामांना आपण प्राधान्य दिले असून, येत्या काळात सर्व प्रकल्प मार्गी लागणार असल्याचा विश्वास खासदार गोडसे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमधील कार्यालयाबाहेर बंदोबस्त 

शिंदे गटात सामील झालेल्या खासदार गोडसे यांच्या नाशिकमधील कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शिवसैनिकांकडून कार्यालयावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता, बंदोबस्त देण्यात आला असून, सध्या गोडसे हे दिल्ली येथे त्यांच्या शिवसेनेतील इतर खासदार सहकार्‍यांसोबत व्यग्र आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : शिवसेनेतील एकांडे शिलेदार हेमंत गोडसे यांनी साधली नामी संधी appeared first on पुढारी.