Site icon

नाशिक : शेतकरीकन्या रेल्वे पोलिस दलात भरती

नाशिक (देवळा/खामखेडा) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील खामखेडा येथील शेतकरी रवींद्र गंगाधर शेवाळे यांची कन्या अंकिता ही पोलिस भरतीचे सर्व निकष पूर्ण करत विविध अडथळ्यांच्या शर्यतीतून रेल्वे पोलिस दलात दाखल झाली. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गतवर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या अंकिताने प्रथम वर्ष कला शाखेसाठी बहिःस्थ प्रवेश घेत नाशिक येथील पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात ऑगस्ट महिन्यात प्रवेश घेतला होता अन् सातच महिन्यांत व वयाच्या एकोणावीस वर्षे पूर्ण करण्याच्या आतच यशाला गवसणी घातली.अंकिताने यापूर्वी शालेय स्तरावर जलतरण स्पर्धेत यश मिळविले होते. जानेवारी महिन्यात तिने रेल्वे पोलिस भरतीसाठी मैदानी स्पर्धेत चांगले गुण मिळवत लेखी परीक्षेसाठी पात्र झाली होती. लेखी परीक्षेचा निकाल 11 एप्रिलला लागला. त्यात अंकिताने यश मिळवल्याने रेल्वे पोलिस दलात भरती होण्यास ती पात्र ठरली. अंकिता ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. वडील रवींद्र अल्पशिक्षित असूनदेखील आजोबा गंगाधर शेवाळे व आजी सुनंदा यांनी पुढाकार घेत खेड्यात शिक्षणाची गैरसोय होईल, म्हणून लोणी (प्रवरानगर) येथे तिला पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षणासाठी पाठविले होते. खेळात तसेच अभ्यासात चुणूक दाखवत तिने सर्वांचेच लक्ष वेधले. कठोर मेहनत घेत वयाच्या विशीच्या आतच तिने पोलिस दलात प्रवेश मिळविल्याने तिच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. तिला जिद्द व चिकाटीचा फायदा झाल्याचे नाशिक येथील सूर्या अकॅडमीचे संचालक समीर काकड व तुषार कैचे यांनी सांगितले.

आजी-आजोबा, आई यांच्या प्रोत्साहनाने माझी पोलिस होण्याची इच्छा पूर्ण झाली. भविष्यात मी नक्कीच इतर विद्यार्थिनींना पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन करेल. – अंकिता शेवाळे, खामखेडा.

हेही वाचा:

The post नाशिक : शेतकरीकन्या रेल्वे पोलिस दलात भरती appeared first on पुढारी.

Exit mobile version