नाशिक : शेतकरी गटाने पिकवला विषमुक्त वाटाणा, प्रतिकिलो ‘इतका’ भाव

विषमुक्त वाटाणा,www.pudhari.news

 नाशिक, सिन्नर : संदीप भोर
रासायनिक खतांचा वाढता वापर, सातत्याने घटणारे कृषी क्षेत्र आणि उत्पादन क्षमता, निसर्गाचा असमतोल, वाढणारा उत्पादन खर्च, हमीभाव नसणे आदी समस्यांवर उपाय म्हणून सिन्नर तालुक्यातील हिवरे येथील ग्रीनपीस शेतकरी गटाने विषमुक्त वाटाणा पिकाचे उत्पादन घेतले. त्यांना नुकतेच विषमुक्त असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

हिवरे येथे पानी फाउंडेशन द्वारे आयोजित सत्यमेव जयते फार्मर्स कप स्पर्धा अंतर्गत हिवरे गावातील ग्रीनपीस शेतकरी गटाने विषमुक्त वाटाण्याची शेती यशस्वी करण्याचे ठरविले. एप्रिल महिन्यात स्पर्धा सुरू होत असताना राळेगणसिद्धी या ठिकाणी गट शेतीचे प्रशिक्षण या गटातील काही सदस्यांनी घेतले होते.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावातील 43 सदस्यांना घेऊन 33 एकरवर वाटाणा पिकाची लागवड केली. पीकवाढीच्या काळात पानी फाउंडेशनमार्फत महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांनी ऑनलाइन डिजिटल शेती शाळेतून मार्गदर्शन केले. यामध्ये एकात्मिक व नैसर्गिक कीड नियोजनासाठी अनेक गोष्टींचा वापर शेतकर्‍यांनी केला होता. 8 ऑक्टोबर रोजी गटातील सदस्यांच्या प्रत्येक प्लॉटवरील वाटाणा सॅम्पल पुणे येथील टीयूव्ही नोर्ड प्रयोगशाळेत पाठविले होते. हे सॅम्पल घेण्यासाठी पानी फाउंडेशनच्या टीमने शेतकरी गटाला मार्गदर्शन केले होते. सरपंच सुरेखा रूपवते, उपसरपंच मच्छिंद्र सहाणे आदींसह ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे शेतकरी सांगतात. नवनाथ सहाणे, भीमा बिन्नर, संपत सहाणे, वसंत सहाणे, दिलीप ढोन्नर, राजू बिन्नर, शांताराम सहाणे आदींसह जवळपास 40 शेतकर्‍यांनी उत्तम वाटाणा शेती केली आहे.

एकरी 5 ते 20 क्विंटल उत्पादन

यंदा पावसामुळे सर्वत्र शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरीही या गटातील शेतकर्‍यांनी वाटाण्याचे एकरी पाच ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले. या भागात काही निचर्‍याची व काही भागात काळ्या मातीची शेती आहे. निचर्‍याच्या ठिकाणी चांगले उत्पादन झाल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यांना सुमारे 250 रुपये प्रतिकिलोपर्यंत बाजारभाव मिळाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

पानी फाउंडेशनच्या माध्यमाने यंदा प्रथमच सेंद्रिय पद्धतीने शेती केली. भले उत्पादन थोडे-फार कमी होत असले, तरी विषमुक्त शेती करू शकलो, याचा मनोमन आनंद आहे. पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करू.-विजय देशमुख, अध्यक्ष ग्रीन पीस शेतकरी बचतगट

हेही वाचा :

The post नाशिक : शेतकरी गटाने पिकवला विषमुक्त वाटाणा, प्रतिकिलो 'इतका' भाव appeared first on पुढारी.