नाशिक :शेतकरी-टाटाच्या वादात आमदार कांदे यांची मध्यस्थी

नांदगाव www.pudhari.news

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील साकोरे परिसरात टाटा सोलर कंपनीने सोलर प्रकल्पासाठी खरेदी केलेल्या शेतीक्षेत्रावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने कंपनी आणि शेतकरी यांच्यातील वाद सोडविण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी पुढाकार घेत कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित शेतकऱ्यांना नांदगाव येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृहात बोलवत मध्यस्थी करत चर्चा घडवून आणली.

बैठकीस तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, वनविभागाचे आरएफओ कासार, साकोरा जिल्हा परिषद गटाचे माजी जि. प. सदस्य रमेश बोरसे, भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकारी, टाटा सोलर कंपनीचे छबू नागरे, साकोरे येथील अतुल पाटील, शरद सोनवणे, सतीश बोरसे, किरण बोरसे, एकनाथ मोरे, मधुकर बोरसे, संजय सदगीर तसेच शेतकरी उपस्थितीत होते.

यावेळी आमदार कांदे यांनी संबंधित शेतकऱ्यांची समिती स्थापन करत अतिक्रमित जमिनीची आकडेवारी घेतली. आपण इतके वर्ष अतिक्रमित जागेत राहिलो असून, आता पुढच्या पिढीसाठीदेखील विचार करण्याची गरज असून, भविष्यात जी जागा मिळणार आहे, त्यासाठी महसूल शुल्क भरावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करत तो कमी करण्याचे शेतकऱ्यांनी केलेल्या विनंतीला मान देत आमदार कांदे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच यासाठी काही निधीदेखील आपण कंपनीकडून मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांची समिती स्थापन करून तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत. त्यामुळे नवीन जमीन संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करून देण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठविता येईल. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव पाठवून नियमित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन कांदे यांनी देत हा वाद मिटविला. कंपनीच्या प्रतिनिधींनीदेखील संबंधित शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन मध्यस्थी करावी, असे आवाहनही आमदार कांदे यांनी यावेळी केले.

हेही वाचा:

The post नाशिक :शेतकरी-टाटाच्या वादात आमदार कांदे यांची मध्यस्थी appeared first on पुढारी.