नाशिक : शेतकऱ्यांची द्राक्ष आज थेट नाशिककरांच्या दारात

द्राक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या कृषिमालाला रास्त दर मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या योजने अंतर्गत आणि पोलिस कुटुंबाकडूनही शेतकऱ्यांचा कृषिमाल विक्रीसाठी सहभाग असावा, यासाठी शनिवार (दि. १८) पासून सिटीसेंटर माॅलसमोरील लक्षिका सभागृहात दोनदिवसीय महाद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पोलिस आयुक्त आणि ग्रीनफिल्ड ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने होत असल्याची माहिती ‘ग्रीनफिल्ड’चे अध्यक्ष अमोल गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या द्राक्ष महोत्सवात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही सहभाग घेऊन पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबांचा शेतकऱ्यांच्या विकासासाठी हातभार लागावा यासाठी प्रत्येक विक्री केंद्रात पोलिस कुटूंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या उद्घाटनासाठी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ आदी उपस्थित राहणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्य शासनाने नाशिक शहरात शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी जागा निवडलेल्या आहेत, त्या जागांवर ही द्राक्ष विक्रीची केंद्र राहणार आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त शेफ विष्णू मनोहर हे महिलांना द्राक्षापासून तयार होणारे खाद्यपदार्थ, द्राक्षांचे दागिने याबाबत माहिती देतील. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट द्राक्ष उत्पादकांचा गौरव, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्कृष्ट द्राक्ष विक्रेता पोलिस पाल्य, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि द्राक्ष उत्पादकांचा गौरव होणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

१०० दिवस दर्जेदार द्राक्ष

प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी म्हटले आहे की, नाशिकची ओळख ही द्राक्ष व रुद्राक्ष यामुळे आहे. त्यामुळे द्राक्षांचाही महोत्सव हा महाशिवरात्रीपासून करण्याचे नियोजन आहे. तसेच नाशिक शहरात विविध ४५ ठिकाणी १०० दिवस शेतकऱ्यांची दर्जेदार द्राक्ष थेट नाशिककरांना उपलब्ध करणार असल्याचे ‘ग्रीनफिल्ड’चे अध्यक्ष अमोल गोऱ्हे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post नाशिक : शेतकऱ्यांची द्राक्ष आज थेट नाशिककरांच्या दारात appeared first on पुढारी.