Site icon

नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा

मुसळधार पावसामुळे दुष्काळी म्हणवणारा चांदवड तालुक्यात जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी साचल्याने पावसाने अहंकार माजवला आहे. नदी, नाले, ओहोळ, ओसंडून वाहत आहे. शेतातील पिकांमध्ये कंबरेपर्यंत पाणीच पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरे पडली तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात रस्ते, पूल वाहून गेल्याने वाड्या–वस्त्यांवरील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील संपूर्ण पिके खराब झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाने पुन्हा एकदा विरजण टाकल्याची भावना बळीराजा चिंतीत आहे. चांदवड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून रब्बी हंगामासाठी शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. चांदवड तालुक्यात २४ तासात ९९.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या १५ ते २० दिवसापासून तालुक्यात सूर्यनारायणाचे अद्याप दर्शन झालेले नाही. दररोज मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदे, कांदे बियाणे, टोमटो, भुईमुग, मुग, उडीद, झेंडूची फुले, बाजरी, डाळींब आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांमध्ये कबरेपर्यंत पाणी साचले असल्याने पिके पूर्णतः सडले आहेत. पर्यायाने पिकांचे एक टक्का देखील उत्पन्न मिळणार नाही, अशी स्थिती आहे. पिके घेण्यासाठी आलेला खर्च देखील वसूल होणार नसल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. दर दोन वर्षांनी अवकाळी पाऊस, गारपीट, अतिरिक्त पाऊस, वादळ यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी झालेला घास निसर्ग हिरावून घेत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन तो बँका, पतसंस्था, सावकार यांच्या कर्जाच्या खाईत बुडला जात आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

घरे पडली, रस्ते, नाले खचले

रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे काजीसांगवी येथील दादा वाळके यांच्या घरात पावसाचे पाणी घुसले. यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब काजीसांगवी हाउसिंग सोसायटीत स्थलांतरीत करण्यात आले होते. दिघवद रस्त्यावरील रोम वस्तीजवळ नाना सोनवणे यांच्या घराला पावसाच्या पाण्याने विळखा घातल्याने कुटुंबियांचा संपुर्क तुटला. तसेच बंधाऱ्याचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पन्हाळे रस्त्यालगत मंगेश सोनवणे यांच्या घरात पाणी शिरले. यामुळे घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले. वागदर्डी येथील पगार वस्तीकडे जाणारा रस्ता वाहून गेला. वडगाव पंगु येथील सरपंच रवींद्र गोजरे यांच्या वस्तीकडे जाणारी नदीवरील फरशीपूल वाहून गेला. विक्रम भागवत चव्हाण, जालिंदर संपत चव्हाण, विठ्ठल भाऊसाहेब चव्हाण, शिवाजी गंगाधर चव्हाण यांची घरे पडली. पोपट शंकर चव्हाण यांचे शेत वाहून गेले. कुंडाणे येथील रमण खरे यांच्या घराची भिंत पडली. पाटे येथील राहुल प्रकाश कासव यांची विहीर पडली. तर भाऊसाहेब पुंजाराम आहिरे (कुंदलगाव), अंबादास पांडुरंग जाधव (भुत्याणे), शिवाजी रघुनाथ ठोके (पाटे), विश्वनाथ एकनाथ शिंदे (शिंगवे), आनंदा पारू ठोंबरे (मेसनखेडे), संजय भीमा गायकवाड (उसवाड), त्र्यंबक पुंजा मोगल (वडनेरभैरव), गंगाबाई रंगनाथ क्षीरसागर (दुगाव), निवृत्ती श्रावण माळी (कोकणखेडे), शंकर देवराम पगारे व हरी शांताराम मार्कंड (मेसनखेडे) आदींच्या घरांचे नुकसान झाल्याची माहिती चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.

अंगावर भिंत पडून एक ठार

चांदवड तालुक्यातील पिंपळद गावात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून दिलीप गणपत माळी (५८) हे गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.

चांदवड : नुकतेच शेतात लावलेले लाल कांदे मुसळधार पावसामुळे असे पाण्याखाली गेल्याने कांदा पिक नामशेष झाले आहे

.तालुक्यातील पावसाची नोंद

चांदवड – ११७.५ मिमी, रायपुर  १०७.३ मिमी, दिघवद – ११७.५ मिमी, दुगाव   १२६.५ मिमी, वडाळीभोई – ३८.५ मिमी, वडनेरभैरव – ३८.० मिमी.

चांदवड:  वागदर्डी येथील पगार वस्तीकडे जाणारा रस्ता पावसाच्या पुरात वाहून गेल्याने वाड्या वस्त्यांवरील संपर्क तुटला. (सर्व छायाचित्रे: सुनिल थोरे).

हेही वाचा:

The post नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण appeared first on पुढारी.

Exit mobile version