नाशिक : शेतकऱ्याच्या स्वप्नाचा लाल चिखल, टोमॅटोला अवघा 4 रुपयांचा भाव

टोमॅटोला भाव नाही ,www.pudhari.news

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हात नगदी पिक संबोधले जाणाऱ्या टोमॅटो पिकाला उतरती कळा लागली आहे. कवडीमोल भावात टोमॅटो विकला जात असल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने गुजरात राज्यातील सुरत मंडी मध्ये टोमॅटो विक्रीसाठी पाठवला होता मात्र शेतकऱ्याला किलोला 4 रुपये इतका कवडीमोल भाव मिळाल्याने पदरी निराशा पडली आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली. मात्र टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याची वाताहत झाली आहे. शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. कांदया पाठोपाठ टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

निर्यातक्षम टोमॅटो चार रुपये, लाल व गारशेल (कवडी फुटलेला) टोमॅटो ६ रुपये किलो व प्रति कॅरेट वीस ते ऐंशी रुपये इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बळीराजाने एक रुपये तीस पैसे प्रमाणे एका टोमॅटो रोपच्या काडीला पैसे मोजून  लागवड केली. मात्र, टोमॅटो सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे टमाटा खराब झाला.  आता कडक उन्हाळा असल्याने टोमॅटो लाल होत असल्याने आवक ही वाढली आहे. त्यात टोमॅटो दर कमी असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्याला किलोला 4 रुपये इतका कवडीमोल भाव मिळाला.

टोमॅटो पिक कोणत्याही हंगामात येत असल्याने कळवण तालुक्यात कळवण खुर्द, पाळे, अभोणा, कनाशी, शिरसमनी यासह जवळजवळ सर्वच गावांत टोमॅटो पीक घेतले जात आहे. गुजरात राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कळवणचा टोमॅटो विक्रीला जात आहे. आकारमान, दर्जा प्रतवारी यानुसार या टोमॅटोला चांगली मागणी देखील आहे, परंतु भाव नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. त्याचा खर्च वसुल होणेही कठीण झाले आहे. कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व टोमॅटोची लागवड केली जाते. मात्र, अनेक वेळा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला भाजीपाला रस्यावर फेकून देण्याची वेळ येते.

लाखो रुपये खर्च करून टोमॅटो पिकाची लागवड केली. मात्र ४ ते ६ किलो रुपये भावाने टोमॅटो विकला जात आहे. कमिशन, गाडी भाडे, हमाली खर्च जाऊन हातात फक्त एक-दोन हजार रुपये उरतात. काही वेळेला तेही उरत नाही. त्यामुळे मजुरीचा देखील खर्च निघत नाही. शासनाने तात्काळ उपायोजना करून भाव वाढविण्याची गरज आहे.
– निलेश बाळासाहेब शिंदे, शेतकरी, कळवण खूर्द

७ हजार टोमॅटो पिकाची रोपाची लागवड केली असून टोमॅटो तोडणी सुरु आहे. गुजरात राज्यात विक्रीसाठी पाठवले होते, खर्च जाऊन १०० कॅरेटचे फक्त दीड हजार रुपये आले आहेत. असा भाव मिळत असल्यास आमचा खर्च देखील निघणार नाही.
-यशवंत पाटील, शेतकरी

हेही वाचा :

The post नाशिक : शेतकऱ्याच्या स्वप्नाचा लाल चिखल, टोमॅटोला अवघा 4 रुपयांचा भाव appeared first on पुढारी.