नाशिक : शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार; अधिकाऱ्याला धडा

येवला www.pudhari.news

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील खिर्डीसाठे येथील शेतकऱ्याला अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी लाभार्थ्यांची यादी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्याने चिडलेल्या येवला तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याने थेट संबंधित शेतकऱ्यालाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार येवल्यात उघडकीस आला. यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी तहसील कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारताच धक्काबुक्की करणाऱ्या कर्मचाऱ्याने माफी मागत शेतकऱ्यास हवी असलेली यादी उपलब्ध करून दिल्याने या वादावर पडदा पडला आहे.

शेतकरी नागरे यांनी तहसील कार्यालयातील महसूल सहायकाकडे लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मागितली होती. मात्र, संबंधिताने त्यावेळी यादी न देता उडवाउडवीची उत्तर दिले. यानंतर नागरे यांनी येवला तहसीलदार आबासाहेब महाजन यांना फोनवरून संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली. तहसीलदारांनी फोन करून विचारणा केल्याचा संबंधिताला राग आला व त्यांनी थेट शेतकऱ्याला धक्काबुक्की करून कार्यालयातून घालवून दिले. यानंतर नागरे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती शिवसेना नेते संभाजी पवार यांना फोनवरून दिली असता त्यांनी तत्काळ तहसील कार्यालय गाठले. मात्र, संबंधित अधिकारी जेवणासाठी घरी गेल्याचे कारण सांगत कार्यालयात येण्याचे टाळत असल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी नायब तहसीलदार पंकजा मगर यांची भेट घेतली. संपूर्ण प्रकरण त्यांना सांगितल्यानंतर संबंधित अधिकारी हे कार्यालयात आले आणि त्यांनी संबंधित शेतकऱ्याला हवी असलेली यादी दिली व शेतकऱ्यासोबत झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. यावेळी शिवसेना नेते संभाजी पवार, कांतीलाल साळवे, बापूसाहेब गायकवाड यांच्यासह सुमारे 50 शेतकरी उपस्थित होते. यानंतर शिवसेना नेते संभाजी पवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. तहसील कार्यालयामध्ये काम करताना अडवणूक केली होते. परंतु थेट शेतकऱ्याला धक्काबुक्की करणे हुकूमशाही राजवटीप्रमाणे आहे. यामुळे असला कुठलाही प्रकार कोणत्याही कार्यालयात खपवून घेणार नाही.

हेही वाचा:

The post नाशिक : शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार; अधिकाऱ्याला धडा appeared first on पुढारी.