नाशिक : ‘शेल्टर’ला उदंड प्रतिसाद; आज समारोप

शेल्टर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक क्रेडाई मेट्रो आयोजित शेल्टर 2022 या गृहप्रदर्शनाला नाशिककरांचा उदंड प्रतिसाद लाभला. अनेकांनी शनिवार, रविवार सुट्टीचा मुहूर्त साधून आपल्या स्वप्नातील घराचा शोध घेतला. तर काहींनी आपले गृहस्वप्नही साकारले. दरम्यान, सोमवारी (दि.28) या प्रदर्शनाचा समारोप असून, नागरिकांना आपले गृहस्वप्न साकारण्याची संधी असणार आहे.

डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित या भव्य गृहप्रदर्शनात राष्ट्रीय स्तराला साजेसे असे नीटनेटके आयोजन, आकर्षक आणि नावीन्यपूर्ण स्टॉल्स, पार्किंगची प्रशस्त सोय, विविध आकर्षक ऑफर्सची रेलचेल बघावयास मिळाली. चारच दिवसांत सुमारे 40 हजार नागरिकांनी शेल्टरला भेट दिली असून, 250 पेक्षा अधिक सदनिकांचे बुकिंग झाले आहे. दरम्यान, समारोप कार्यक्रमासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, सरोज आहिरे, अ‍ॅड. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे उपस्थित राहणार आहेत.

नियमात झालेल्या अनेक बदलांमुळे आज नाशिकमध्ये सुमारे 30 ते 35 मजले इमारती निर्माण होत असल्याने शहराची स्कायलाइन बदलत आहे. कधीकाळी एक अथवा दोन मजली टुमदार घराचे शहर आता उंच इमारतींचे शहर होत आहे. नाशिकमध्ये सर्वांनी पर्यावरणाशी समतोल राखून असा संतुलित विकास करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीस अनेक जण उत्सुक आहेत. – कृणाल पाटील, समन्वयक शेल्टर.

भाग्यवान विजेते असे…
शेल्टर 2022 मधील लकी ड्रॉ विजेत्यांमध्ये किरण पिंगळे, दीपक सूर्यवंशी, अभय काळे, अभिजित अटल, अजित शिर्के यांचा समावेश आहे.

‘विचार समृद्धीचा… पत्ता नाशिकचा – नाशिक नेक्स्ट’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात शंभरपेक्षा अधिक बिल्डर यांचे 500 हून अधिक प्रकल्प, बांधकाम साहित्य, इंटेरिअर तसेच आघाडीच्या गृहकर्ज देणार्‍या संस्था एकाच छताखाली आहेत. अगदी 9 लाख रुपये किमतीच्या प्लॉटपासून 5 कोटी रुपयांचे फ्लॅट्स येथे उपलब्ध आहेत. मोठ्या शहरांसारख्या टाउनशिपची सुरुवात नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी झाली. अशा प्रकरच्या टाउनशिपला अनेक कारणांमुळेदेखील ग्राहकांची पसंती मिळत आहे. – रवि महाजन, अध्यक्ष, नाशिक क्रेडाई मेट्रो.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘शेल्टर’ला उदंड प्रतिसाद; आज समारोप appeared first on पुढारी.