नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा

भटके श्वान,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात मोकाट कुत्र्यांकडून लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच आहे. असे असताना महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याने श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी डॉ. प्रमोद सोनवणे यांना दिला आहे.

मोकाट कुत्र्यांच्या त्रासाविषयी नागरिकांकडून दूरध्वनी तसेच आॉनलाइन पद्धतीने तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या अनेक तक्रारी मनपा आयुक्तांना प्राप्त झाल्याने त्यांनी मनपा पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांची कानउघडणी करत कामात सुधारणा करा, अन्यथा ठेका रद्द करण्याचा इशारा दिला आहे. मनपा पशुसंवर्धन विभागाने यंदा शरण्या वेल्फेअर या नाशिकच्याच संस्थेला मोकाट कुत्रे पकडून त्यांच्या निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिला आहे. या संस्थेने आतापर्यंत 80 हजार मोकाट कुत्र्यांना पकडल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला असला, तरी शहरात ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी पहावयास मिळतात. रात्री अपरात्री, पहाटे कामावर ये-जा करणार्‍या नोकरदार वर्गाला तसेच शाळेत, महाविद्यालयात जाणार्‍या युवक युवतींना या मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागतो. कुत्रे मागे लागल्याने अनेकदा नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागले आहे. तसेच अनेक ठिकाणी कुत्र्यांनी हल्ले केल्याने लहान मुले गंभीर
जखमी झाले आहेत.

मनुष्यबळाविषयीच प्रश्नचिन्ह
आत्तापर्यंत श्वान निर्बीजीकरणाच्या ठेक्यावर मनपाचे पाऊण कोटी रुपये खर्च झाले आहेत. मोकाट कुत्रे पकडण्यासाठी मनपाकडे पुरेशा डॉग व्हॅन आणि मनुष्यबळ तरी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण अनेकदा तक्रारी केल्यानंतर डॉग व्हॅन व कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जाते. यामुळे मनपा आयुक्तांनी एकदा या ठेक्याशी संबंधित बाबींचा आढावा घ्यावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा appeared first on पुढारी.