नाशिक : संघटनात्मक बांधणीसाठी अमित ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद

अमित ठाकरे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरणनिर्मिती आणि मनसैनिकांंमध्ये चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये मनसैनिकांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीची तयारी करण्याचे निर्देश दिले. या संघटनात्मक बैठकीचा अहवाल पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर करण्यात येणार असून, मनसेच्या मनपातील सत्ता काळात सीएसआर निधीतून तयार केलेल्या प्रकल्पांची दखल घेतली जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले

ठाकरे यांचे मंगळवारी (दि.२८) सकाळी पक्षाच्या राजगड कार्यालयात आगमन झाले. यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, महिला आघाडीच्या अध्यक्ष सुजाता डेरे, जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नेते सलीम शेख, पराग शिंत्रे यांनी त्यांचे स्वागत केले. दोनदिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सिडको, सातपूर या पश्चिम मतदारसंघातील भागासह पूर्वमधील पंचवटी व नाशिकरोड विभागातील कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. संध्याकाळी माध्यमांशी औपचारिक संवाद साधत कार्यकर्त्यांशी संवाद वाढविण्याच्या दृष्टीने राज्यभर दौरे करत असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये बैठक घेत असल्याचे त्यांनी सांगितले. गरज भासल्यास संघटनात्मक बदलाचे संकेतही ठाकरे यांनी दिले.

बॉटिनिकल गार्डन सुरू होणार

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना मनसेने मनपाच्या माध्यमातून सीएसआर फंडाव्दारे नाशिक शहरात विविध प्रकल्प राबविले. त्यापैकी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक दायित्वातून पाथर्डी फाटा येथील उद्यानात बॉटनिकल गार्डन साकारण्यात आले आहे. गार्डनमध्ये बोलक्या झाडांचा शो उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे उदघाटन त्यावेळी रतन टाटा यांच्या हस्ते झाले होते. यानंतर एक ते दीड वर्ष उद्यान सुरू राहिले. परंतु, मनसेची सत्ता गेल्यानंतर या उद्यानाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले ते आजतागायत आहे. हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी वनविभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, लवकरच बॉटनिकल गार्डन सुरू करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post नाशिक : संघटनात्मक बांधणीसाठी अमित ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद appeared first on पुढारी.