नाशिक : संजय गांधी, श्रावणबाळ लाभार्थ्यांसाठी ११९७ कोटींचे अर्थसहाय्य वितरित

संजय गांधी निराधार योजना www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील निराधार व्यक्तींना समाजकल्याण विभागाने आधार दिला असून, निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवतन योजना अंतर्गत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने ११९७ कोटी इतका निधी नुकताच उपलब्ध करून दिला आहे. उपलब्ध निधी तत्काळ लाभार्थ्यांना वाटप करावा, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे, यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ४४५ कोटी, तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत ७५२ कोटी असा एकूण 1197 कोटी इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरित करण्यात आला आहे. दरम्यान, संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत किमान १८ ते ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारांमुळे स्वतः या चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षांवरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त आदींना लाभ मिळणार आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन या योजनांचे स्वरूप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरित होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर नियोजन करावे. शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने लाभार्थी व्यक्तींना त्याचा फायदा होणार आहे. – सुमंत भांगे, सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.

हेही वाचा:

The post नाशिक : संजय गांधी, श्रावणबाळ लाभार्थ्यांसाठी ११९७ कोटींचे अर्थसहाय्य वितरित appeared first on पुढारी.