नाशिक : संत कबीरनगरमध्ये भीषण आग

कबीरनगर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
द्वारका चौकालगतच्या संत कबीरनगर झोपडपट्टीत शनिवारी (दि. 6) सायंकाळी भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार महावितरणच्या विजेच्या खांबावरून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उडालेल्या ठिणग्या एका घरावरील लाकडांवर पडल्याने ही आग लागल्याचे समजते. आगीमुळे काही घरांमधील गॅस सिलिंडरचाही स्फोट झाल्याने आगीची तीव्रता वाढली होती. अग्निशमन दलाचे 15 बंब व 45 हून अधिक जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून तासाभरात आग आटोक्यात आणली. द्वारका चौकातील मरीमाता मंदिर व कावेरी हॉटेलच्या बाजूला संत कबीरनगर झोपडपट्टी आहे.

या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने लहान-मोठी घरे असून, जवळपास दोन ते अडीच हजार नागरिक राहतात. शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास येथील आबिद शेख यांच्या घराजवळील विजेच्या खांबावरून ठिणग्या बाहेर पडल्या. त्या एका घरावरील लाकडांवर पडल्याने आगीने पेट घेतला. काही क्षणांत ही आग वणव्यासारखी पसरली. त्यानंतर ही आग पसरत गेल्याने काही घरांतील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आजूबाजूच्या घरांनाही आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरातील आकाशात धुराचे लोट पसरले होते. घरांना आगीने वेढल्यामुळे संसारोपयोगी साहित्य व कपड्यांनी पेट घेतला. एकापाठोपाठ चार सिलिंडरचा स्फोट झाल्याने द्वारका परिसर हादरला होता. घटनेची माहिती कळताच तहसीलदार अनिल दौंडे, सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह पोलिस पथक, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे शिंगाडा तलाव येथील महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्रासह अन्य सहा अग्निशमन केंद्रांतून 15 पाण्याचे बंब व 30 ते 40 अग्निशमन जवान आग विझविण्यासाठी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मेगा व लिटिल ब्राऊजर तसेच अन्य सामग्रीच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून आग विझविली. यावेळी परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना दूर राहण्याचे आवाहन केले. आगीवर नियंत्रण मिळविताच यंत्रणेने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केली. आगीचे नेमके कारण शोधण्याचाही प्रयत्न केला जात असून, या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. सारडा सर्कलकडून द्वारकाकडे जाणारी वाहतूक वळवली होती. एकेरी वाहतूक करण्यात आली होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचे दिसले. त्याचप्रमाणे परिसरात बघ्यांची गर्दी जमल्याने पोलिसांना गर्दी पांगविण्यासाठी मेहनत घ्यावी लागली.

मदतीसाठी प्रयत्न ..
आगीच्या घटनेत अनेक घरांचे नुकसान झाले असून, शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश आमदार देवयानी फरांदे यांनी तहसीलदार अनिल दोंडे यांना दिले आहेत. जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : संत कबीरनगरमध्ये भीषण आग appeared first on पुढारी.