Site icon

नाशिक : संत निवृत्तिनाथ पालखी स्वागतासाठी मनपाकडून तीन लाखांचा निधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महानगरपालिकेतर्फे रविवारी (दि. ४) संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती कार्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. पंचायत समिती कार्यालयाचे प्रांगण वारकऱ्यांनी फुलून गेले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा स्वागत समितीतर्फे गमे, बानायत यांचा सत्कार करण्यात आला.

आयुक्त गमे यांनी, यापुढे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ पालखी सोहळा स्वागतासाठी मनपाकडून तीन लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल, माजी आमदार बाळासाहेब सानप, श्री संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर अध्यक्ष नीलेश गाढवे-पाटील, सचिव सोमनाथ घोटेकर, पालखी सोहळाप्रमुख नारायण मुठाळ, महंत भक्तिचरणदासजी, भाऊसाहेब गंभीरे उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावासमोरही मनपातर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. येथे मंडप उभारण्यात आला होता. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. त्यानंतर दिंडीमालक मोहन बेलापूरकर, दिंडीचालक बाळकृष्ण डावरे, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा स्वागत समितीचे कार्याध्यक्ष नरहरी उगलमुगले, समितीचे सल्लागार मोहनराव जाधव, राहुल बर्वे आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मनपाच्या पंचवटीमधील इंदिरा गांधी रुग्णालयातील पथकाने वारकऱ्यांना आरोग्यसेवा दिली. पिण्याचे पाणी पुरवले. त्यानंतर रामकृष्णहरी, माउली-माउली असा घोष करीत पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी उपअभियंता नितीन राजपूत, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, नितीन गंभीरे, सुभाष बहिरम, अरुण मोरे, विक्रांत गोंगे, प्रतिभा चौधरी, जयवंती चव्हाण, डॉ. अक्षय पाटील, सचिन डोंगरे, वीरसिंग कामे, सागर पिठे आदी मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. इच्छामणी केटरर्सचे गाढवे बंधू यांच्याकडून वारकऱ्यांना अल्पोपाहारची व्यवस्था केली होती.

हेही वाचा :

The post नाशिक : संत निवृत्तिनाथ पालखी स्वागतासाठी मनपाकडून तीन लाखांचा निधी appeared first on पुढारी.

Exit mobile version