नाशिक : संरक्षणविषयक उत्पादनांसाठी उद्योजकांना व्हेंडरशिप देणार

aima www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
संरक्षण खात्यासाठी लागणार्‍या साधनसामग्रीचे उत्पादन करू इच्छिणार्‍या उद्योजकांना व्हेंडरशिप देण्यास तसेच त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास तयार आहे, अशी माहिती माझगाव डॉक शिपबिल्डर लि.चे मुख्य व्यवस्थापक सुहास झेंडे यांनी दिली.

संरक्षण खात्यातील उत्पादने तयार करण्याची व्हेंडरशिप उद्योजकांना मिळावी यासाठी इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे आयोजित बैठकीत सुहास झेंडे बोलत होते. व्यासपीठावर आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बुब, सचिव योगिता आहेर, खजिनदार राजेंद्र कोठावदे, माझगाव डॉकचे व्यवस्थापक संतोष भांगरे व नीलेश पंडित आदी उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रासाठी लागणार्‍या उत्पादनांसाठी आपले योगदान देऊ इच्छिणार्‍या उद्योजकांसाठी ही नामी संधी असून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे सांगून झेंडे यांनी युद्धनौका, पाणबुड्या आणि नौदल तसेच संरक्षण खात्याच्या विविध उत्पादनांची माहिती देऊन पुरवठा साखळी तसेच प्रशिक्षणाबाबत उद्योजकांना माहिती दिली. आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी प्रास्ताविकात आयमाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आत्मनिर्भर भारतासाठी 70 टक्क्यांपर्यंत गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार मदत करणार असल्याने उद्योजकांनी त्याचा लाभ घेऊन देशाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहनही पांचाळ यांनी केले. याबाबतची पुढील बैठक लवकरच होणार आहे. ज्या कुणाला या संदर्भात माहिती हवी असल्यास त्यांनी आयमा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सरचिटणीस ललित बुब यांनी केले. ललित बुब यांनी आभार मानले. यावेळी माजी अध्यक्ष विवेक पाटील, प्रमोद वाघ, हर्षद कापडे, जगदीश पाटील, विलास लिधुरे, जयंत पगार, राहुल गांगुर्डे, सुमित बजाज, हेमंत खोंड यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : संरक्षणविषयक उत्पादनांसाठी उद्योजकांना व्हेंडरशिप देणार appeared first on पुढारी.