नाशिक : सक्तीच्या वीजबिल वसुली मोहीमेत महावितरणचा शेतकर्‍यांना शॉक

महावितरण

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे शासनाने शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये असा आदेश दिलेला असताना दुसरीकडे मात्र नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनमाड, नांदगाव, येवल्यामध्ये महावितरण कंपनीने शेतकर्‍यांकडून सक्तीने थकीत वीजबिल वसुली सुरू केली आहे. थकीत बिलापोटी प्रत्येक शेतकर्‍याने किमान पाच हजार रुपये भरण्याचा फतवा महावितरणने काढला आहे. ज्या भागातील शेतकर्‍यांनी पाच हजार रुपये नाही भरले त्या भागातील शेतकर्‍यांचे सुमारे 200 पेक्षा जास्त ट्रान्स्फॉर्मर बंद करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विजेअभावी शेकडो हेक्टरवरील शेतीपिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून, महावितरणने दिलेल्या या शॉकमुळे शेतकर्‍यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शेतकर्‍यांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्यामुळे महावितरण आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे थकबाकी वसुली सुरू करण्यात आली असून, शेतकर्‍यांनी चालू बिल भरले तरी त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नसल्याची माहिती महावितरणाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशी एकापाठोपाठ एक संकटे शेतकर्‍यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. यावर्षी तर सलग झालेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे पिके उदध्व्स्त झाली असून, खरिपाचा हंगाम हातातून निघून गेल्यानंतर शेतकर्‍यांच्या सर्व अशा रब्बीच्या हंगामावर असल्यामुळे त्यांनी कांदे, गहू, हरभरा, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. चांगला पाऊस झाला असल्यामुळे छोटे, मोठे धरण, बंधार्‍यांपासून शेततळे, विहिरीपर्यंत सर्वच तुडुंब भरले आहे. पाण्याचा मुबलक साठा असल्यामुळे पिके जोरात येतील अशी शेतकर्‍यांना आशा होती, मात्र त्यांच्या या आशेवर वीज महावितरणने पाणी फेरण्यास सुरुवात केली आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी वीज महावितरणने धडक मोहीम सुरू केली असून, ज्या भागातील शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात वीजबिल थकले त्या भागातील विद्युत डिप्या बंद करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मनमाड विभागात 104 विद्युत डीपी बंद करण्यात आल्या आहेत. त्यात मनमाड-नांदगाव तालुक्यातील 42 आणि येवला तालुक्यातील 62 डीपींचा समावेश आहे. मनमाड विभागाप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील इतर भागातदेखील हीच परिस्थिती असून, जिल्ह्यात सुमारे 200 विद्युत डिप्या बंद करण्यात आल्या आहे. वीज महावितरणने सुरू केलेल्या थकीत वीजबिल वसुली मोहिमेमुळे शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली असून, शेततळ्यात, विहिरीत पाण्याचा मुबलक साठा आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

बंद करण्यात आलेली विद्युत डिपींची संख्या…

नांदगाव तालुका – 42

मनमाड विभागात शेतकरी वीजग्राहक संख्या – 49 हजार

येवला तालुका – 62

थकबाकी 526 कोटी

हेही वाचा:

The post नाशिक : सक्तीच्या वीजबिल वसुली मोहीमेत महावितरणचा शेतकर्‍यांना शॉक appeared first on पुढारी.