नाशिक : सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी 

 सप्तशृंगगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अर्ध शक्तिपीठ असलेल्या आदिमातेच्या सप्तशृंगगडावर 30 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू आहे. व्यापाऱ्यांची दुकानाची लगबग सुरू असून, मंगळवारी (दि.28) सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत यात्राेत्सवाची आढावा बैठक झाली.

यात्रोत्सव हा दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पार पाडण्याचे नियोजन केले आहे. खासगी वाहनांना या काळात प्रवेश बंद असून, एसटी बसमधून गडावर येता येणार आहे. गावापासून दीड किमी अंतरावर मेळाबसस्थानक केले असून, भाविकांना प्रवेशद्वाराजवळ मेटल डिटेक्टरमधून दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. मंदिरात जाण्यासाठी पाहिल्या पायरीपासून 12 ठिकाणी बारी लावणार असून, मंदिरात सुलभ दर्शनासाठी बॅरिकेडसमधून सोडणार आहे. बैठकीत यात्रा नियोजनासाठी विविध विभाग व त्यांचे तालुका, जिल्हा व विभागस्तरावरील विविध अधिकारी व कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आदी उपस्थित होते. तहसीलदार कापसे यांनी सूचना दिल्या.

चैत्रोत्सवात दि. 4 एप्रिल रोजी भगवतीच्या कीर्तिध्वजाचे विधिवत पूजन होऊन गवळी परिवारातील प्रतिनिधींच्या माध्यमातून पर्वत शिखरावर रात्री ध्वजारोहण होणार असल्याची माहिती देवस्थानने दिली. मंदिर परिसरासह इतर ठिकाणी 70 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. साफसफाईसाठी 35 कर्मचारी तैनात करणार आहे तसेच भक्त निवासाची व्यवस्था आहे. भाविकांसाठी 225 बसेसची व्यवस्था केली आहे. तर आरोग्य विभागाने 4 रुग्णवाहिकांसह 12 वैद्यकीय अधिकारी व 17 आरोग्यसेवक, 3 फिरत्या वैद्यकीय पथकांचे नियोजन केले आहे. उपजिल्हा रुग्णालयात 30 बेडसची व्यवस्था केली असून, नांदुरी येथे खासगी वाहनाची व्यवस्था केली आहे.

यावेळी कळवण पोलिस निरीक्षक समाधान नांगरे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, विश्वस्त संस्थान कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, उपविभागीय रुग्णालय अधीक्षक डॉ. असिफ शेख, राज्य उत्पादन शुल्क मुख्य निरीक्षक ए. बी. सोनार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गो. वी. कासार, राज्य परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक, आगार व्यवस्थापक हेमंत पगार, सार्वजनिक विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए. जी. गायधनी, ए. पवार, राज्य विद्युत महामंडळ अधिकारी पी. एस. उगलमुगले, सरपंच सप्तशृंगगड रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य, राजेश गवळी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी  appeared first on पुढारी.