नाशिक : सप्तशृंगी गडावर महिला चोरांची टोळी सक्रिय; कळवण पोलिसांपुढे आव्हान

सप्तशुंगगड www.pudhari.news

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र देवी सप्तशृंगी गडावर मे महिन्याच्या सुट्टीची पर्वणी साधत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे मंगळवार, रविवार, शुक्रवार हे देवीचे वार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने गडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जळगाव, धुळे, पुणे, नाशिक, गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई, व इतर ठिकाणाच्या भाविकांची गर्दी पहावयास मिळत आहे. मात्र या गर्दीचा फायदा घेत काही महिला चोरांच्या टोळीकडून लूटमार होत असल्याच्या घडत आहेत.

भाविकांच्या गर्दीत संधी साधून एसटी बसमध्ये घुसतांना महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, कर्णफुले, पर्स मधून पैसे चोरणे, पाकीट चोरी करणे, महागडे मोबाईल चोरणे असे प्रकार सातत्याने गड परिसरात होत आहेत. आठ दिवसांपासून बस स्थानकावर वारंवार चोरीचे प्रकार वाढत असून आठ ते दहा महिलांची टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न होत आहे. संशयित चोरांच्या टोळीमुळे वणी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी सप्तश्रृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी मोठ्या  प्रमाणात गर्दी होत असते. याचाच फायदा महिला चोरांच्या टोळी कडून घेतला जात आहे. पौर्णिमा असल्याने दगूबाई सहाणे (60, रा. यवतमाळ), महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन तसेच राहुल निकम (रा. निफाड) यांचे पाकीट चोरून 25 हजार रुपये व उर्मिला पटेल (रा. गुजरात) यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याने त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत ट्रस्टकडे तक्रार करण्यासाठी तक्रारदार गेले असता त्यांना विश्वस्तांकडून उडवाउडवीचे उत्तरे देऊन बोळवणूक केली जाते आहे. त्यामुळे भाविकांकडून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. तसेच याबाबात वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार करूनही अपयश येत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी पोलीस चौकीत तक्रार देण्यास गेले असता पोलीस चौकी कुलूप बंद अवस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न भाविकांना पडला आहे. येथे येणाऱ्या लाखो भाविकांची जबाबदारी फक्त दोन पोलिसांवरच सोपवली असून चार ते पाच पोलीस कर्मचारी व एक महिला पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी नेमणूक करावी अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. कळवण तालुक्यातील महत्वाचे तिर्थक्षेत्र असतानाही याठिकाणी पोलीसांनी लक्ष पुरवणे गरजेचे आहे. राञीच्या वेळेस गस्त वाढवणे  गरज निर्माण झाली आहे.

मंदिर परिसरात व बसस्थानकावर मोठया प्रमाणावर चोरीचे प्रकार होत आहे. संशयित महिला चोरीच्या टोळीत सहा ते सात महिला असुन हे प्रकार थांबवणे गरजेचे आहे. याबाबत कळवण पोलीसांनी लक्ष पुरवणे गरजेचे आहे. येथील पोलीस चैकी ही कायमस्वरूपी उघडी असणे गरजेचे आहे. – दिपक जोरवर, सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सप्तशुंगगड.

हेही वाचा:

The post नाशिक : सप्तशृंगी गडावर महिला चोरांची टोळी सक्रिय; कळवण पोलिसांपुढे आव्हान appeared first on पुढारी.