Site icon

नाशिक : सप्तशृंगी देवीची पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावर आज नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री तथा राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी आज पहाटे पत्नीसमवेत सप्तशृंगी मातेची पूजा करुन दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते भगवतीची आरती करण्यात आली.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सुविद्य पत्नी वृषाली शिंदे व शिंदे कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. तसेच अनिता भुसे, शशी निकम, सुनील देवरे, मनोहर बच्छाव, प्रमोद पाटील, निलेश आहेर, दिनेश गवळी, विश्वनाथ निकम, नंदकिशोर मोरे यांचीही उपस्थिती होती.

गेली दोन महिने मूर्तींसंवर्धनाच्या कामासाठी मंदिर बंंद होते. आता मंदिर देखील खुले करण्यात आले आहे. त्यामुळे गडावर अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आहे. भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे देखील पहाटेच याठिकाणी उपस्थित होते.  देवीची नवीन चांदीची उत्सवमूर्ती देखील तयार आहे. यापुढे देवीच्या मूळ मूर्तीवर अभिषेक न करता याच चांदीच्या मूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे.

दरम्यान पुढील 9 दिवस गडावर भक्तीपूर्ण व उत्साहाचे वातावरण असणार आहे. नवरात्रोत्सवाच्या उत्सवामध्ये ट्रस्ट व ग्रामपंचायतीने नियोजन केले आहे. आदिमायेच्या प्रगट नवरूपाच्या दर्शनासाठी भाविकांची ऐतिहासिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन देवी संस्थान, जिल्हा आणि पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिर चोवीस तास खुले राहणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सप्तशृंगी देवीची पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजा appeared first on पुढारी.

Exit mobile version