नाशिक : सप्तशृंगी देवी संस्थान मधील कर्मचाऱ्यांचा एल्गार

वणी www.pudhari.news

 नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा

साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगीगडची ओळख आहे. येथील सप्तशृंगी देवी संस्थानमध्ये कार्यरत 137 कर्मचाऱ्यांनी ऐन चैञोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपाचा एल्गार पुकारला आहे. त्यानुसार शुक्रवार (दि.24) पासून कर्मचारी संपावर जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

नाशिक वर्कर्स युनियनच्यावतीने सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांच्याकडे वेळोवेळी विविध मागण्यांसाठी निवेदन दिलेले असून सुद्धा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व विश्वस्त मंडळाने याकडे लक्ष देत नसल्याकारणाने नाशिक वर्कर युनियनचे अध्यक्ष डॉक्टर डी. एल. कराड व सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने दि. 24 मार्च रोजी बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदन सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टला देण्यात आले. वारंवार निवेदन देवूनही मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तीव्र स्वरूपात संप पुकारण्यात येणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असतांनाही मर्जीतील लोकांवर वरदहस्त दाखवून इतरांवर अन्याय केला जात असल्याची भावनाही काही कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

देवस्थानातील सर्व कामगार कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग मागील फरकास त्वरित लागू करा. देवस्थानातील सर्व कामगार कर्मचारी यांची वेतनश्रेणी शासकीय अधिकारी यांच्या मार्फत पडताळणी करा. देवस्थानात कामगार कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा धरतीवर नोकरीत सामावून घ्यावे. देवस्थानातील कामगार कर्मचारी यांना प्रेक्षक लिपिक सेवेकरी असे काम वर्षानुवर्ष करून घेतले जाते आणि पगार मात्र सेवकांचा दिला जातो तरी कामाच्या जबाबदारीनुसार वेतन द्यावे. देवस्थानात नवीन भरती न करता नवीन कामगार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देऊन त्या जागेवर नियुक्त करा. देवस्थानात काम करत असलेल्या दोन महिला कामगारांना अद्याप बाळंतपणाच्या रजेचे वेतन अदा केलेले नाही ते त्वरित देय करण्यात यावे. देवस्थानात काम करत असलेल्या सुरक्षारक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक अधिनियमानुसार किमान वेतन लागू करा. अशा प्रमुख मागण्या सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे कर्मचारी यांनी निवेदनाव्दारे मांडल्या आहेत. यावेळी नारद आहिरे, मुरलीधर गायकवाड, शरद शिसोदे, नानाजी काकळीज, संतोष चव्हाण, प्रमोद देशमुख, चंदन गवे आदि कामगार व कर्मचारी उपस्थित होते

सप्तशुंगी देवी संस्थान मध्ये 138 कर्मचारी संपावर जात असून सदरचा संप हा बेमुदत असुन बैठकीनुसार झालेल्या चर्चांमध्ये योग्य मागण्याबाबत निर्णय न झाल्याने कर्मचारी संपावर जाणार आहेत. – मुरलीधर गायकवाड, पदाधिकारी,  सिटु युनियन.

हेही वाचा:

The post नाशिक : सप्तशृंगी देवी संस्थान मधील कर्मचाऱ्यांचा एल्गार appeared first on पुढारी.