नाशिक : सप्तशृंग देवीच्या स्वयंभू मूळमूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

सप्तश्रृंग देवी www.pudhari.news

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा

आद्यस्वयंभू सप्तशृंगी देवीच्या मूर्तीचे संवर्धनाचे कामकाज सुरू होते. संवर्धनाचे काम सुरू असताना श्री सप्तशृंगी देवीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली. तेजोमय, प्रफुल्लित विलोभनीय अशा स्वयंभू मूळमूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.

आदिमाया सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धनाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर सप्तश्रृंगगडावर चैतन्याचे वातावरण अनुभवायला मिळाले. सकाळी आदिमायेच्या आभूषणांचे ट्रस्ट कार्यालयात पूजन होऊन अलंकारांची आदिमायेच्या जयघोषात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आभूषणांच्या दर्शनासाठी भाविक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. श्री भगवती मंदिरात रंगबेरंगी आकर्षक फुलांच्या माळांची केलेली आरास व त्यात आदिमायेस महावस्त्र परिधान करुन सोन्याचे मोठे मंगळसूत्र, कमरपट्टा, नथ, तोडे, कर्णफुले, चांदीचा मुकुट, अलंकारांचा साजशृंगार करण्यात आला होता. प्राचीन मूळ मूर्तीतील आदिमायेची हर्षीत, प्रफुल्लित असलेले विलोभनीय रूप पाहायला मिळाले. विविध धार्मिक विधी राजराजेश्वर द्राविड, धारवाड (कर्नाटक) यांच्या मार्गदर्शनानुसार शांताराम भानुसे, नाशिक, भालचंद्र शौचे, नाशिक, बाळकृष्ण दिक्षीत, त्र्यंबकेश्वर व श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील पुरोहीत संघाच्या वतीने पार पडले. त्यात भगवती मंदिरात सहस्त्र कलश स्नान, संप्रोक्षण विधी, उदक शांति, कलाकर्षण इत्यादी धार्मिक पूजा विधी पूर्ण करण्यात आले. तीन दिवसांपासून आई भगवतीची प्राण प्रतिष्ठा सोहळा सुरू असून कलशाची सप्तशृंगगडावर भव्य अशी मिरवणूक काढण्यात येवून, कलश विधीयुक्त पद्धतीने पुरोहितांचा मंत्रोपचाराने आई भागवतीस समर्पित करण्यात आली. स्वयंभू स्वरूपातील मूर्तीची अध्यक्ष वर्धन पी. देसाई, विश्वस्त तथा तहसीलदार बी. ए. कापसे, विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम, डॉ. प्रशांत देवरे व भूषणराज तळेकर यांचे हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी सोमेश्वरानंद महाराज, विष्णूगिरी महाराज, शिवगिरी महाराज, दिनेशगिरी महाराज, गणेशपुरी महाराज, ऋषीकेश नंदगिरी महाराज यांसह आ. नितीन पवार, आ. देवयानी फरांदे, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, पोलिस उप नरीक्षक महेश निकम, सहायक पोलिस निरीक्षक बबन पाटोळे आदी उपस्थित होते. दरम्यान, संपूर्ण पितृपक्षात 1600 देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान भगवतीच्या सान्निध्यात सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्रापूर्वी होत आहे. शारदीय नवरात्रीच्या प्रथम दिनी अर्थात सोमवार, 26 सप्टेंबर रोजी श्री भगवती मंदिर हे भाविकांना श्री सप्तशृंगी देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

भाविकांसाठी नवरात्रीपूर्वीचेही नियोजन

पूर्वनियोजन व सुरू असलेल्या कार्यवाहीनुसार श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे येणार्‍या भाविकांना दरम्यानच्या मंदिर बंद काळात पहिली पायरी येथे श्री सप्तशृंगी देवीच्या प्रतिकृतीच्या दर्शनाची पर्यायी व्यवस्था तसेच नवरात्री पूर्वी येणार्‍या ज्योत संदर्भीय भाविकांना मशाल / ज्योत प्रज्वलित करण्याची व्यवस्था देखील पहिली पायरी – प्रवेशव्दार येथे उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रसादालय, भक्तनिवास व धर्मांर्थ दवाखाना व इतर अनुषंगिक विविध सेवा-सुविधा विश्वस्त संस्थेच्या वतीने सात्तत्यपूर्वक सुरू असतील.

हेही वाचा:

The post नाशिक : सप्तशृंग देवीच्या स्वयंभू मूळमूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा appeared first on पुढारी.