नाशिक : समृद्धीवर कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू, दोेन गंभीर

अपघात,www.pudhari.news

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. नुकत्याच उद्धघाटन केलेल्या शिर्डी ते भरवीर महामार्गावर आज (दि. 3) रात्री 1 वाजेच्या सुमारास मुंबईकडून शिर्डीकडे जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कार थेट दुसऱ्या लेनवर पलट्या घेत गेल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.

रात्री 1 वाजेच्या सुमारास मुंबईकडून शिर्डी बाजूकडे जाणारी कार (क्र. एम. एच. 20/ ई. वाय. 5257) ही सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरवर आदळून  शिर्डी बाजूकडून थेट मुंबई बाजूकडे जाणा-या लेनवर जावून आदळली. यावेळी कारने दोन ते तीन पलटी घेतल्याने कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात  भरतसिंग परदेशी, नंदीणी (पुर्ण नाव समजून आले नाही) हे दोघे गंभीर जखमी झाले असून धरमसिंग गुसींगे, राजेंद्र राजपूत या दोघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, महामार्गावरील रेस्क्यू पथक व महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकेने कोपरगाव येथे औषधोपचारासाठी पाठविण्यात आले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला घेवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, सिन्नर महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. गायकवाड यांच्यासह महामार्गाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, क्यू. आर. व्ही व्हॅन वाहनावरील कर्मचारी यांनी मदतकार्य केले.

The post नाशिक : समृद्धीवर कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू, दोेन गंभीर appeared first on पुढारी.