नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात

ग्रामपंचायत निवडणुक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी एक हजार 734 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीसाठी मंगळवारपर्यंतची (दि.6) अंतिम मुदत असणार आहे.

नाशिक, कळवण आणि दिंडोरी तालुक्यातील एकूण 88 ग्रामपंचायतींमधील 241 प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांचे 1, 750 अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले होते. तर सरपंचपदासाठी एकूण 377 अर्ज आले होते. अर्ज छाननीनंतर सदस्यपदाचे 16 तर सरपंचाचे दोेन अर्ज अवैध ठरले. त्यामुळे सरपंचांचे 375 व सदस्यांसाठीचे 1,734 उमेदवार रिंगणात आहेत. या इच्छुकांना माघारीसाठी मंगळवार (दि.6) दुपारी 3 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली. त्यानंतर अंतिमत: रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना लगेचच निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच 18 सप्टेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान व दुसर्‍या दिवशी 19 ला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ऐन गणेशोत्सवात निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रामध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण ढवळून निघत आहे.

जांबुटके, कसबे वणीत सरपंचपदाचा एक अर्ज बाद
दिंडोरी : तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाचे दोन तर 170 वॉर्डमधून 10 सदस्यपदासाठी अर्ज बाद झाले आहेत. शिवारपाडा व तळ्याचा पाडा येथे सरपंच व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आल्याने तेथील निवडणूक बिनविरोध होणार आहे. सरपंचपदासाठी 196 अर्ज दाखल झाले होते. त्यातील जांबुटके व कसबेवणी येथील एक अर्ज बाद होत आता 194 उमेदवार रिंगणात आहेत तर सदस्यपदासाठी 1,074 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी आज अर्ज छाननीमध्ये 10 अर्ज बाद झाले असून, 1,064 उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. खेडले, जानोरी, वरखेडा, मडकीजाम येथे प्रत्येकी एक तर कसबेवणी येथील सहा असे एकूण 10 अर्ज आले.

हेही वाचा:

The post नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.