नाशिक : सराईत मोटारसायकलचोर गजाआड

मोटारसायकलचोर www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक गुन्हे शाखेकडून सिन्नर शहरात एका सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक करण्यात आली. बालाजी विष्णू माने (रा. संत गाडगेबाबा नगर, परभणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहे.

गोरख माणिक आळारे (रा. भगूर) यांची हीरो होंडा मोटारसायकल (एमएच 15 बीएम 7555) 17 सप्टेंबर रोजी सिन्नर बसस्थानक आवारातून चोरीस गेली होती. त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सिन्नर शहरात मागील बर्‍याच दिवसांपासून मोटारसायकली चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्याने सदर मोटारसायकल चोरीचा तपास समांतररीत्या स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्या पथकाकडूनदेखील सुरू होता. सोमवारी (दि. 19) स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार रवींद्र वानखेडे, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम असे सायंकाळी 7.30 वाजता मोटारसायकल चोरीचे आरोपींबाबत सिन्नर शहरात माहिती काढत असताना पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना एक मोटारसायकल चोरटा आडवा फाटा परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती दिली. त्यानुसार पथकाने आडवा फाटा परिसरात सापळा रचून बालाजी माने या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत विचारपूस करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मोटारसायकल चोरली असल्याची कबुली दिली. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली आहे.

मोटारसायकलींसह जबरी चोरीचे गुन्हे
दरम्यान, चोरट्याकडे अधिक चौकशी करता त्याने नाशिकरोड, शिर्डी तसेच परभणी येथे प्रत्येकी 1 अशा तीन मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. बालाजी माने याच्यावर अगोदर मोटारसायकल चोरी, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहे. सदर आरोपीस पुढील कारवाई कामी सिन्नर पोलिस ठाण्यात ताब्यात दिले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सराईत मोटारसायकलचोर गजाआड appeared first on पुढारी.