नाशिक : सर्वपित्री अमावास्येनिमित्त पूर्वजांचे स्मरण

सर्वपित्री अमावास्या,नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पितृपक्षातील अंतिम दिवस असलेल्या सर्वपित्री अमावास्येला घरोघरी पितरांचे पूजन करून स्मरण करण्यात आले. गोदाघाटावर महालय श्राद्ध आणि पिंडदानासाठी गर्दी झाली होती. काकस्पर्शासाठी तपोवनात रांगा लागल्या होत्या.

गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या पितृपक्षाचा समारोप रविवारी (दि. 25) सर्वपित्री अमावास्येने झाला. आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहिती नसलेल्या नागरिकांनी या दिवशी घरोघरी पितरांचे पूजन करत त्यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या. ‘सर्वपित्री’ला महालय श्राद्धविधी करण्यास अधिक महत्त्व आहे. त्यामुळे राज्य व परराज्यातून आलेल्या भाविकांनी गोदातटी रामकुंडावर पहाटेपासूनच गर्दी केली होती. श्राद्धविधी आणि पितरांच्या स्मरणानंतर आपल्या पूर्वजांना घास देण्यासाठी तपोवनात नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी काकस्पर्शासाठी तासन्तास नागरिक ताटकळत उभे होते. दरम्यान, नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वर येथेही श्राद्ध तसेच त्रिपिंडी विधीसाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविकांनी हजेरी लावली.

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत श्राद्ध आणि पितरांसंबंधित विधींवर बंधने आली होती. यंदाच्या वर्षी कोरोना नियंत्रणात असल्याने संपूर्ण पितृपक्षात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पूर्वजांचे श्राद्धकर्म करून त्यांचे स्मरण करण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली. कोरोेनाने मृत्यू झालेल्या आपल्या आप्तस्वकीयांचे श्राद्धकर्म करून नागरिकांनी त्यांच्याबद्दलची श्रद्धा व्यक्त केली.

आप्तेष्टांची धावपळ
गेल्या काही वर्षांत रामकुंड परिसरात कावळ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे काकस्पर्शासाठी आप्तेष्टांची धावपळ उडाली. अनेक जणांनी काकस्पर्श विधीसाठी पंचवटी अमरधाम शेजारील तपोवन रस्ता गाठला, तर काहींनी थेट तपोवन, गंगापूर रोडवरील बालाजी मंदिर परिसरात काकस्पर्शासाठी नैवैद्य अर्पण केला. परगावाहून आलेल्या भाविकांनी रामकुंड व गोदाघाट भागातील गोरगरीब व गरजूंना अन्नदान केले.

The post नाशिक : सर्वपित्री अमावास्येनिमित्त पूर्वजांचे स्मरण appeared first on पुढारी.