नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ!

ई पॉस मशिन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेंतर्गत पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनमधील सॉफ्टवेअर अपडेट केले. परंतु, अपडेशनंतरही मशीनमधील गोंधळ कायम आहे. वारंवार उद‌्भवणाऱ्या सर्व्हरच्या समस्येमुळे धान्य वितरणात अडचणी येत असल्याने रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी धान्य वितरित केले जाते. ई-पॉस मशीनवरून हे धान्य लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, ई-पॉस मशीनच्या अडचणींचा डोंगर कायम आहे. पुरवठा विभागाने मशीनमधील साॅफ्टवेअरचे अपडेशन केले. पण, त्यानंतरही सर्व्हर, मशीनवर लाभार्थ्यांच्या थम स्कॅनिंगची समस्या कायम आहे. त्यामुळे रेशन दुकानांच्या बाहेर तासनतास‌् हातात रांगेत तिष्ठत उभे राहूनदेखील धान्य मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जिल्ह्यात महिन्याकाठी २ हजार ६०९ रेशन दुकानांमधून ३५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना रेशनचे वाटप केले जाते. परंतु, सर्व्हरची समस्या कायम असल्याने वारंवार मशीन बंद पडते आहे. विशेषत: ग्रामीण भागात ही समस्या अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. परिणामी लाभार्थ्यांना तोंड देताना दुकानदारांच्या नाकीनव येत आहे. याबाबत पुरवठा विभागाकडे तक्रारी करूनही त्यामध्ये सुधारणा होत नसल्याने रेशन दुकानदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सांगा धान्य कुठे ठेऊ? 

रेशन दुकानदारांकडून ऑगस्ट महिन्याचे धान्य वितरण लाभार्थ्यांना सुरू आहे. त्याचवेळी पुरवठा विभागाकडून पुढील महिन्याचे धान्य उचल करण्यासाठी सांगितले जात आहे. मात्र, अगोदरच मशीनच्या अडचणीमुळे चालू महिन्यातील वितरणात अडथळे येत आहेत. त्यातच पुढील महिन्याचे धान्य उचल करून ते ठेवायचे काेठे, असा प्रश्न दुकानदारांना भेडसावतो आहे.

ई-पॉस मशीनला सर्व्हर डाउनच्या समस्येमुळे वारंवार ते बंद पडते. ते पुन्हा चालू होण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यातही लाभार्थ्यांच्या थम‌च्या स्कॅनिंगची शाश्वती कमी असते. धान्यासाठी तास‌्नतास उभे राहावे लागत असल्याने नागरिक गोंधळ घालतात. मशीनच्या समस्येबाबत मंत्रालयात संपर्क साधला असता लवकरच ती दूर करण्याचे आश्वासन मिळत आहे. -निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष, रास्तभाव दुकानदार संघटना.

हेही वाचा:

The post नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ! appeared first on पुढारी.