नाशिक : सव्वा लाख विद्यार्थ्यांना डीबीटीचा हप्ता वितरित; आदिवासी विकास विभागाची योजना

आदिवासी विकास विभाग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील सुमारे 500 शासकीय आश्रमशाळांमधील तब्बल सव्वा लाख विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या डीबीटीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासून विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध झाले आहेत. आता दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

आदिवासी विकास विभागाकडून शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, नाइट ड्रेस, पीटी ड्रेस, स्वेटर, टॉवेल, तेल, टूथपेस्ट व ब्रश तसेच अंडरगार्मेंट्स, बेडिंग अशा वैयक्तिक वापराच्या वस्तू आणि शालेय व लेखनसामग्री खरेदीसाठी डीबीटी देण्यात येते. त्यासाठी सप्टेंबरअखेरची पटसंख्या ग्राह्य धरली जाते. इयत्ता पहिली ते चौथीसाठी साडेसात हजार, पाचवी ते नववीसाठी साडेआठ हजार, तर इयत्ता दहावी ते बारावीसाठी साडेनऊ हजार डीबीटी निश्चित करण्यात आलेली आहे. राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या चार अपर आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या ५०० शासकीय आश्रमशाळांमध्ये एक लाख ७५ हजार ९६० विद्यार्थी आहेत. त्यापैकी एक लाख ६८ हजार ७८० विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती आहे. एक लाख २८ हजार १२१ विद्यार्थ्यांच्या अर्जाला प्रकल्प कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली. त्यापैकी एक लाख २२ हजार १८१ विद्यार्थ्यांना डीबीटी वर्ग करण्यात आली. मुख्याध्यापक स्तरावर ४० हजार अर्ज प्रलंबित आहेत.

रक्कम वाढविण्याची शिफारस :  दरम्यान, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डीबीटी देण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून, डीबीटीच्या रकमेत वाढ करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने काही महिन्यांपूर्वी समिती स्थापन केली आहे. या समितीने रक्कम वाढविण्याची शिफारसही केली होती. मात्र, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही वाढीव रकमेची प्रतीक्षा कायम आहे.

प्रकल्प कार्यालयनिहाय डीबीटीधारक विद्यार्थी : अकोला-१,९७२, औरंगाबाद-१,४६०, धारणी-३,९०९, कळमनुरी- १,३००, किनवट-४,३८५, पांढरकवडा-२,०२४, पुसद- १,८७४, अहेरी- २,०३९, भामरागड- १,७४५, भंडारा- ११६, चंद्रपूर-१,४१८, चिमूर- ९२९, देवरी- २,७०७, गडचिरोली- ६,०११, नागपूर- ६४५, वर्धा-१४०, धुळे-७,०५३, कळवण- ९,८६४, नंदुरबार- १०,३३७, नाशिक- १२,९७४, राजूर- ३,३२४, तळोदा- १२,६९३, यावल- ३,३७६, डहाणू- ७,८४३, घोडेगाव- ३,६४२, जव्हार- ८,४०५, पेण- ४,२३९, शहापूर-५,३९६, सोलापूर- ३६१.

हेही वाचा:

The post नाशिक : सव्वा लाख विद्यार्थ्यांना डीबीटीचा हप्ता वितरित; आदिवासी विकास विभागाची योजना appeared first on पुढारी.