नाशिक : सहकार मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न- छगन भुजबळ

नाशिक (लासलगाव)  : पुढारी वृत्तसेवा
बाजार समित्यांमध्ये सोसायटी संचालकांऐवजी सर्व शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार योग्यच आहे. मात्र, या बाजार समित्यांना निवडणूक खर्चामुळे निवडणुका घेणे कठीण होणार असून, खर्चामुळे या संस्था मोडकळीस निघतील. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा हा घाट घातला असल्याचा आरोप माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर केला आहे. लासलगाव येथे विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालकांचा सत्कार तसेच शेतकरी मेळावा झाला. या प्रसंगी ते बोलत होते.

आ. भुजबळ म्हणाले, सहकार संस्थांवर भाजपचे सदस्य नसल्याने गेल्यावेळीदेखील त्यांनी बाजार समित्यांवर मागच्या दाराने प्रतिनिधी पाठविले होते. त्यांना आपले लोकप्रतिनिधी वाढवायचे असतील, तर त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, वसंत पवार, गुणवंत होळकर, हरिश्चंद्र भवर, अनिल कुंदे, प्रकाश वाघ, शिवाजी सुरासे, दत्तू डुकरे, डॉ. श्रीकांत आवारे, विनोद जोशी आदी उपस्थित होते. यावेळी आ. भुजबळ यांनी येणार्‍या काळात महविकास आघाडी निवडणुकींना एकत्रित सामोरे जाईल. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटन अधिक मजबूत करावे, महाविकास आघाडीला मजबूत करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी लासलगाव परिसरातील विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला.

हेही वाचा :

The post नाशिक : सहकार मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न- छगन भुजबळ appeared first on पुढारी.