नाशिक : साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ॲड. अजय मिसर सरकारी वकील

ॲड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दि. १३ जुलै २०११ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २७ नागरिकांचे जीव गेले, तर १२७ जण गंभीर जखमी झाले होते. हे बॉम्बस्फाेट इंडियन मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनेने घडवल्याचे समोर आले. या प्रकरणात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये जुलै २०११ मध्ये ऑपेरा हाउस, झवेरी बाजार व दादर या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणी मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तपास करून जानेवारी २०१२ ते एप्रिल २०१६ या कालावधीत ११ जणांना पकडले आहे. त्यापैकी एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवादविरोधी पथकाने या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी तांत्रिक पुरावे गोळा केले असून, गुन्ह्याचा तपास, घटनाक्रम, पैशांचे व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, इंडियन मुजाहिद्दिन संघटनेची कार्यप्रणाली आदी माहिती गोळा केली आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून अटक केलेल्यांना मुंबई, दिल्ली, बंगळुरू येथील कारागृहांमध्ये कैद केले आहे. महाराष्ट्र शासनाने दहशतवादविरोधी पथकाच्या शिफारशीवरून ॲड. अजय मिसर यांची या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. ॲड. मिसर यांना याआधी पाकमोडिया स्ट्रीट गोळीबार खटला, मालेगाव बॉम्बस्फोट खटला, महाराष्ट्र पोलिस अकादमी रेकी, वर्धन घाेडे खून खटला, इकबाल कासकर खंडणी खटला, गॅंगस्टर रवि पुजारीविरोधातील खटले आदी महत्त्वांच्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला आहे.

इंडियन मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनेने केलेल्या बाॅम्बस्फोटामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष, परिस्थितीजन्य व तांत्रिक पुरावे न्यायालयात मांडण्याचे आव्हान आहे. मुंबई एटीएसने चांगला तपास केला आहे. या प्रकारचे खटले विशिष्ट विचारसरणी व विचारपूर्वक चालवणे आवश्यक आहे. पुरावे शाबित करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी राहणार आहे. – ॲड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील.

हेही वाचा:

The post नाशिक : साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ॲड. अजय मिसर सरकारी वकील appeared first on पुढारी.